बॉलिवूड वयस्कर अभिनेते त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींशी रोमान्स करतात, यावरून अनेकदा टीका होत असल्याचं पाहायला मिळतं. अलीकडेच, ‘सलाम वेंकी’मध्ये २४ वर्षीय पुरुषाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या काजोलला याबद्दल विचारणा झाली. त्यावेळी तिने शाहरुख खान आणि सलमान खान सारखे अभिनेते त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रींशी रोमान्स का करतात, याबद्दल तिचं मत नोंदवलं.
हेही वाचा – तोतरं बोलायचा हृतिक रोशन; वडिलांचा विरोध पत्करून हृतिक बनला अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “माझ्या लहानपणी….”
‘अजेंडा आजतक’मध्ये बोलताना काजोल म्हणाली की, “चित्रपट हा देखील शेवटी एक व्यवसाय आहे, ज्यामध्ये नफा मिळवणं हा हेतू असतो. मला वाटतं की आपल्या फिल्म इंडस्ट्रीतील हिरोंनाही असंच वाटतं की चित्रपट हा एक व्यवसाय आहे. त्यामध्ये शेवटी तुम्ही काहीही करा, तो चित्रपट हिट होण्यासाठी प्रत्येक नायकाला गरजेचे ते प्रयत्न करावेच लागतात. त्यांच्या डोक्यावर ही मोठी जबाबदारी आहे.” मात्र, हे तिचे मत असून तथ्य नसल्याचे तिने स्पष्ट केले.
यावेळी काजलने तिच्या करिअरमधील वैविध्यपूर्ण भूमिकांबद्दल भाष्य केलं. “मला कोणीतरी हा प्रश्न विचारला, ‘तू एक अभिनेत्री म्हणून वाढली आहे, पण तू केलेल्या भूमिकांइतकी विविधता तुझ्या समकालीन लोकांमध्ये आढळली नाही’. मला वाटतं की ते लोक नंबर गेममध्ये अडकले आहेत, त्यामुळे त्यांच्यात विविधता आढळत नाही. ते नंबर गेमची जबाबदारी पार पाडत आहेत,” असं काजोल पुढे म्हणाली.
दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला, अक्षय कुमारवरही सम्राट पृथ्वीराजमध्ये आपल्यापेक्षा लहान मानुषी छिल्लरबरोबर रोमान्स केल्याबद्दल टीका झाली होती. त्या टीकेला अक्षयने उत्तरही दिलं होतं. “मी माझ्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान अभिनेत्रींबरोबर काम करतो, याचा त्यांना हेवा वाटतो, मी ५५ वर्षांचा झालो असेल तरी दिसतो का?” असा प्रतिप्रश्नही त्याने केला होता.