काजोल चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री मानली जाते. काजोलने आपल्या करिअरमध्ये ‘बाजीगर’पासून ‘फना’पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. काजोलने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात असे काही चित्रपट केले होते, जे नंतर तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. यातील एक चित्रपट म्हणजे १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दुश्मन’. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त काजोलने या चित्रपटासंबंधित एक किस्सा शेअर केला आहे.
हेही वाचा- सहा महिन्यांच्या लाडक्या लेकीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; किंमत वाचून व्हाल थक्क
काजोलने या चित्रपटाचे वर्णन तिच्या कारकिर्दीतील सर्वात भयानक चित्रपट असे केले आहे. काजोलने पोस्ट शेअर करीत लिहिले की, ‘दुश्मन’ हा माझ्या करिअरमधील सर्वात भयानक चित्रपट आहे, ज्यासाठी मी कधीही हो म्हटले आहे. आशुतोष राणाने मला पडद्यावर खूप घाबरवले होते आणि मला खात्री आहे की त्याने तुम्हा सर्वांनाही घाबरवले असेल. हा अस्वस्थ विषय माझ्यासाठी सोयीचा बनवल्याबद्दल मी पूजा भट्ट आणि तनुजा चंद्रा यांचे आभार मानते. हा चित्रपट आजही पहिल्यास मी अस्वस्थ होते.
‘दुश्मन’ चित्रपटातील काजोलचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात काजोलने दुहेरी भूमिका साकारली होती. ‘दुश्मन’मधील उत्कृष्ट अभिनयासाठी काजोलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा स्क्रीन अवॉर्डही मिळाला होता. याशिवाय काजोलला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. ‘दुश्मन’मध्ये काजोलबरोबर संजय दत्त, आशुतोष राणा आणि तन्वी आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.