काजोलची प्रमुख भूमिका असलेला ‘दो पत्ती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉन आणि शाहीर शेख यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसोहळ्याच्या निमित्ताने काजोलने ‘द इंडियन एक्सप्रेस’बरोबर संवाद साधला. यावेळी तिने विश्वासघातावर भाष्य केले आहे.

“विश्वासघात हे नेहमीच वैयक्तिक असतात”

काजोलने म्हटले, “विश्वासघात हे नेहमीच वैयक्तिक असतात. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी विश्वासघाताचा सामना करावा लागतो. तुम्ही जेव्हा लहान असता, तेव्हादेखील तुम्हाला विश्वासघात झाल्याचे वाटू शकते. तरूणपणी देखील काही वेळा तुम्हाला धोका खावा लागतो. जर तुम्ही याचा सामना केला नाही याचा अर्थ तुम्ही पुरेसे आयुष्य जगला नाही. आपण सगळेच कधी ना कधी विश्वासघाताचा अनुभव घेतो.”

पुढे बोलताना काजोलने म्हटले आहे, “‘दो पत्ती’ चित्रपटात विश्वासघाताबद्दल उत्तम प्रकारे दाखवले गेले आहे. अनेक गाठी अशा आहेत, ज्यामध्ये विश्वासघात पाहायला मिळेल.”

चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत तुम्ही चिंताग्रस्त आहात का?यावर बोलताना काजोलने म्हटले, “जेव्हा तुम्ही गणवेश घालता तेव्हा त्याप्रति आदराची भावना निर्माण होते. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या माझ्या कोणत्याही चित्रपटात मी चिंताग्रस्त नव्हते. मी माझे काम मन लावून करते आणि असे जेव्हा मी करते त्यावेळी मला माझ्यावर १०० टक्के विश्वास असतो. प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोण असतो, कोणाला आवडेल, कोणाला आवडणार नाही. पण, ती वेगळी परिस्थिती आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर प्रेम करावे यासाठी आम्ही काम करतो. मी नेहमीच त्या प्रेमाची दाद देते.”

अजय देवगणने सिंघम चित्रपटात पोलिसाची भूमिका केली आहे, त्याच्याकडून या चित्रपटासाठी काही टिप्स घेतल्या होत्या का? यावर बोलताना काजोलने म्हटले, “मी प्रत्येक ठिकाणी हे सांगतिले आहे की घरी मी सिंघम असते. या भूमिकेसाठी अजयकडून कोणत्याही प्रकारच्या टिप्स घेतल्या नाहीत.”

हेही वाचा: Atul Parchure : अभिनेता अतुल परचुरेचं निधन, पु.लंची शाबासकी मिळवणारा हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड

दो पत्ती या चित्रपटाची निर्मिती कनिका ढिल्लन आणि क्रिती सेनॉन यांनी केली आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.