मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना जितकी प्रसिद्धी मिळते, जितके विविध कारणांसाठी त्यांचे कौतुक केले जाते, तितकाच त्यांना टीकेचादेखील मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. सोशल मीडियावर ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो. आता अभिनेत्री काजोल (Kajol)ने एका मुलाखतीत ती ट्रोलिंगचा कसा सामना करते याबाबत वक्तव्य केले आहे. त्याबरोबरच लोकांना कलाकारांच्या आयुष्यातील चांगली बाजू दिसते; पण त्यामागचे कष्ट दिसत नाहीत, असेदेखील तिने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर काजोल म्हणाली…

काजोलने एक्सप्रेसो (Expresso)च्या चौथ्या सेशनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सोशल मीडियाबाबत मत व्यक्त करताना तिने म्हटले, “मी संपूर्ण आयुष्य सोशल मीडियाशिवाय जगले आहे, त्याबद्दल मी आनंदी आहे. मी सहा वर्षांपूर्वी सोशल मीडियाचा वापर सुरू केला. ते काही खरं आयुष्य नाही. रेड कार्पेटवरील तुम्ही माझे फोटो तिथे पाहू शकता. मात्र, मी तयार होण्यासाठी मी सकाळी ५ वाजता उठते, ११.३० ला थकून परत येते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर जाते, हे तुम्ही पाहू शकणार नाही. तुम्ही कलाकारांच्या आयुष्यातील काही भाग पाहू शकता. खरं तर इतर सगळे जितकी मेहनत करीत असतात, तितकीच मेहनत आम्हीही करीत असतो. आमचेदेखील चांगले आणि वाईट दिवस असतात. पण, तरीही जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतो, त्यावेळी हसत असतो.”

याविषयी अधिक बोलताना काजोलने म्हटले, “मी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर वेगळ्या दृष्टिकोनातून बघते. जेव्हा लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात, त्यावेळी त्यांना वाटते की, तितकाच तिरस्कार करण्याचाही त्यांना हक्क आहे. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की, ते बरोबर आहेत; मात्र प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असल्यानं आम्हाला या सगळ्याला सामोरं जावं लागतं.”

हेही वाचा: “प्रिय आशुआई…”, अश्विनी एकबोटेंच्या पुण्यतिथी निमित्ताने सूनबाईची भावुक पोस्ट, म्हणाली, “आजचा दिवस…”

‘दो पत्ती’ या चित्रपटातून काजोल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉनदेखील दिसणार आहे. या चित्रपटात ती पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसोहळ्याच्या निमित्ताने काजोलने ‘द इंडियन एक्सप्रेस’बरोबर संवाद साधला होता. यावेळी तिने विश्वासघातावर भाष्य करताना म्हटले होते, “जर तुम्ही विश्वासघाताचा सामना केला नाही याचा अर्थ तुम्ही पुरेसे आयुष्य जगला नाही. आपण सगळेच कधी ना कधी विश्वासघाताचा अनुभव घेतो.” २५ ऑक्टोबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kajol on social media trolling says you will see my photo on the red carpet but you wont see hard work nsp