बॉलिवूडमधील काही चित्रपट प्रदर्शित होऊन १५ ते २० वर्षे उलटली असली तरी आजही चाहते ते तितक्यात उत्सुकतेने पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. करण जोहरच्या या चित्रपटातील तिन्ही पात्रे विशेष गाजली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २४ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आता या चित्रपटातील अभिनेत्री काजोलने एक खुलासा केला आहे.
काजोलने नुकतंच ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरसह खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले. यावेळी ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी तिला या चित्रपटातील शेवटच्या दृश्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने फारच मजेशीर उत्तर दिले.
आणखी वाचा : “काजोलमुळे…” तब्बल २५ वर्षांनी ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाबद्दल रवीना टंडन स्पष्टच बोलली
जर अंजलीची व्यक्तिरेखा तुझ्या म्हणण्यानुसार पुढे गेली असती, तर तू शेवटी सलमान आणि शाहरुख यांच्यात कोणाची निवड केली असतीस? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “माझ्या मते जर अंजलीचे पात्र असते तर तिने कधीच साडी नेसली नसती. ती कॉलेजमध्ये असताना नेहमी ट्रॅक पँट घालायची आणि त्यात ती सुंदर दिसायची. त्यावेळी ती महागडे शूज वापरायची.”
“जर स्क्रिप्ट माझ्यानुसार पुढे गेली असती, तर मी शेवटी सलमान खानने साकारलेले अमन या पात्राची निवड केली असती. मी राहुल म्हणजेच शाहरुख खानबरोबर कधीही गेले नसते. पण चित्रपट पाहिला तर अंजलीच्या पात्राला राहुलबरोबर जाण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. म्हणूनच ते घडले”, असे काजोलने सांगितले.
दरम्यान ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तिला या चित्रपटाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलवले होते. या चित्रपटातील गाणी, डायलॉग प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते.