Kal Ho Naa Ho Movie Behind the Scenes : जियो! खुश रहो! मुस्कुराओ! क्या पता…’कल हो ना हो’. २००३ मध्ये ‘अमन माथुर’ नावाचा एक मुलगा सुंदर, सरळ, साध्या ‘नैना कॅथरीन कपूर’च्या आयुष्यात आला. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात भलेही झालं नाही पण, ही अनोखी कहाणी अजरामर नक्की ठरली. आज शाहरुख खानला त्याचे जगभरातील चाहते ‘किंग खान’, ‘बादशहा’, ‘जवान’ म्हणून ओळखत असतील पण, त्या प्रत्येक चाहत्याच्या मनात अमन माथुरने एक वेगळं घर केलं आहे. मोठ्या पडद्यावर भर रस्त्यात ‘प्रीटी वुमन’ म्हणणारा, स्वत:पेक्षा जास्त इतरांचा विचार करणारा अमन माथुरसारखा एक तरी मित्र पाहिजे असं चित्रपटाच्या मध्यांतरापर्यंत प्रत्येकाला वाटतं. पण, शेवटी तो अंगावर शहारा आणणारा क्लायमॅक्स पाहून काळजाचा ठोका चुकतोच! ‘प्रेमाचं पहिलं आणि शेवटचं पाऊल मैत्री आहे’ अशी आगळीवेगळी व्याख्या सांगणाऱ्या ‘कल हो ना हो’ला आज २० वर्ष पूर्ण झाली आहेत.
‘कल हो ना हो’सारखा मास्टरपीस जर कोणी पाहिला नसेल तर नवलच! या चित्रपटाचं नावं जरी घेतलं, तरी दिग्दर्शक निखिल अडवाणीने निवडलेली तगडी स्टारकास्ट आणि यामधील प्रत्येक पात्र डोळ्यासमोर जिवंत उभं राहतं. ‘कल हो ना हो’चं संपूर्ण कथानक, यामधील कलाकार या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत. परंतु, आज ‘कल हो ना हो’ला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण या चित्रपटाबद्दलचे कधीही न ऐकलेले किस्से जाणून घेणार आहोत…
१९७१ च्या गाजलेल्या चित्रपटाशी तुलना
२००३ मध्ये ‘कल हो ना हो’ प्रदर्शित झाल्यावर अनेकांनी या चित्रपटाची तुलना ह्रषिकेश मुखर्जींच्या १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आनंद’ चित्रपटाशी केली, तर अनेकांनी याची तुलना १९७०च्या ‘सफर’शी केली होती. यावर निर्माता करण जोहरने, “आमच्या चित्रपटाच्या या संपूर्ण ‘सफर’मध्ये आम्हाला प्रचंड ‘आनंद’ मिळाला. ‘कल हो ना हो’ हा एक स्वतंत्र चित्रपट असून याची तुलना होऊ शकत नाही.” असं सेट मॅक्सला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं.
…तर चित्रपटात झळकले असते वेगळेच कलाकार
‘कल हो ना हो’च्या नैनाची भूमिका करण जोहरने खास करीना कपूर खानला डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती पण, करीनाने अधिक मानधन सांगितल्यामुळे पुढे यात प्रीती झिंटाची वर्णी लागली. ही गोष्ट आता सर्वश्रूत आहे. परंतु, चित्रपटातील इतर कलाकारांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं होतं. जया बच्चन यांनी साकारलेल्या जेनिफरच्या (नैनाची आई) भूमिकेसाठी आधी नीतू सिंग यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती. एवढंच नाहीतर सैफ अली खानच्या भूमिकेसाठी सगळ्यात आधी सलमान खान, अभिषेक बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांची नावं दिग्दर्शकाच्या डोळ्यासमोर होती. अखेर करणने स्वत: रोहित पटेलच्या भूमिकेसाठी सैफचं नाव सुचवलं होतं.
‘कल हो ना हो’ चित्रपटाचा तेलुगू रिमेक
तेलुगू चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध निर्माते कृष्णा वामसी यांच्या मनात ‘कल हो ना हो’ चित्रपटाने एक वेगळी जागा निर्माण केली होती. त्यामुळेच कृष्णा यांनी या चित्रपटाचा तेलुगू रिमेक करण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये त्यांनी ‘चक्रम’ चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये बाहुबली फेम प्रभासने मुख्य भूमिका साकारली आहे.
प्रीती झिंटाने डिझाईन केला बाहुल्यांचा पोशाख
‘कल हो ना हो’मध्ये कलाकारांप्रमाणे सर्वाधिक लक्ष वेधलं ते छोट्या जियाच्या मॉर्डन बार्बी हाऊसने! जियाच्या बाहुलीचं घर तुम्हाला आवडलं का? हे घर आंतरराष्ट्रीय ब्रँडने डिझाईन केलेलं असल्याने त्यामधील बाहुल्यांना सुद्धा वेस्टर्न पोशाख देण्यात आला होता. पण, चित्रपटाच्या कथानकानुसार त्या बाहुल्यांना देसी टच देणं खूपच महत्त्वाचं होतं. याकरता प्रीतीने स्वत: बाहुलीचे सुंदर ड्रेस देसी टचनुसार डिझाईन केले होते.
दमदार कॅमिओंनी भरलेला ‘कल हो ना हो’
‘कल हो ना हो’ चित्रपटात डिझायनर अनीता श्रॉफ अदजानिया, नृत्यदिग्दर्शका फराह खान, उदय चोप्रा, काजोल, राणी मुखर्जी अशा एकापेक्षा एक दमदार कलाकारांनी कॅमिओ केला आहे. करण आणि फराहने एका सामान्य हॉटेल ग्राहकांच्या रुपात या चित्रपटात कॅमिओ केला होता. याशिवाय अर्जुन कपूरच्या सिनेक्षेत्रातील प्रवासाला ‘कल हो ना हो’मुळे सुरुवात झाली. त्याने या चित्रपटाचं सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं.
‘कल हो ना हो’ नव्हे तर ‘हे’ असतं चित्रपटाचं नाव….
‘कल हो ना हो’ या चित्रपटाचं नाव सुरुवातीला करण जोहर ‘कभी अलविदा ना केहेना’ असं ठेवणार होता. परंतु, अचानक त्याने हा निर्णय बदलला आणि २००६ मध्ये ‘कभी अलविदा ना केहेना’च्या रुपात प्रेक्षकांना एक नवा रोमँटिक ड्रामा पाहायला मिळाला.
प्रीती झिंटाची बॉडी डबल
‘कल हो ना हो’ चित्रपटाच्या सुरुवातीला नैना (प्रीती झिंटा) जॉगिंग करत असल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. प्रीतीला शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याने या जॉगिंग सीनसाठी तिची बॉडी डबल म्हणून दिग्दर्शक निखिल अडवाणीने एका मॉडेलला असाईन केलं होतं.
सगळीच गाणी ठरली अजरामर! जाणून घ्या ‘प्रीटी वुमन’चा किस्सा
‘कल हो ना हो’, ‘प्रीटी वुमन’, ‘डिस्को साँग’, ‘माही वे’ या चित्रपटातील प्रत्येक गाणं प्रेक्षकांच्या आजही ओठावर आहे. ‘प्रीटी वुमन’ गाण्यासाठी करण जोहरने आंतरराष्ट्रीय कॉपीराइट कायद्याचं पालन केलं होतं. रॉय ऑर्बिसनकडून करणने ‘प्रीटी वुमन’ गाण्याचा परवाना खास विकत घेतला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आज २० वर्षांनंतरही इन्स्टाग्राम रील्सवर हे गाणं सुपरहिट ठरलं आहे. याशिवाय ‘कल हो ना हो’ चित्रपटाची मुख्य धून संगीत दिग्दर्शक लॉय मेंडोस यांनी पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये बनवली होती. ही धून कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहावी अशी दिग्दर्शक निखिल अडवाणींची खूप इच्छा होती.
शाहरुखच्या मुलांसाठी वेगळा क्लायमॅक्स
‘कल हो ना हो’च्या क्लायमॅक्समध्ये अमन माथुर शेवटी जगाचा निरोप घेतो असं दाखवण्यात आलं आहे. पण, हा क्लायमॅक्स शाहरुख खानची मुलं आर्यन आणि सुहाना यांच्यासाठी खास एडिट करण्यात आला होता. एका मुलाखतीत शाहरुखने मी माझ्या मुलांना कधीच ‘कल हो ना हो’चा शेवट दाखवलेला नाही करणने त्यांना खास एडिट व्हर्जन दाखवलं होतं. ‘कल हो ना हो’ रिलीज झाला तेव्हा आर्यन खान ६ वर्षांचा, तर सुहाना फक्त ३ वर्षांची होती.