Kalki 2898AD Box office collection: लोकप्रिय अभिनेता प्रभासची मुख्य भूमिका असलेला ‘कल्की : २८९८एडी’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले. तरीही हा चित्रपट चित्रपटगृहात टिकून आहे. आतापर्यंत कल्की : २८९८एडीने भारतात ५९५.७५ कोटींची कमाई केली आहे.
‘नाग अश्विन’ दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या २१ व्या दिवशी ६.५ कोटींची कमाई केली आहे. ही कमाई काल केलेल्या कमाईपेक्षा जास्त आहे. या चित्रपटाने २० व्या दिवशी ५.१ कोटींची कमाई केली होती. कल्की या चित्रपटाच्या निर्मात्यांनी १३ जुलैला म्हणजेच १६ व्या दिवशी चित्रपटाने जगभरात एक हजार कोटींची कमाई केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर निर्माते किंवा दिग्दर्शक यांनी कोणतीही घोषणा केली नाही. मात्र, त्यानंतर चित्रपटाने ४५ कोटींची कमाई केली असून, शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात कमाई केलेला १०५५ कोटींचा आकडा पार केल्याची शक्यता आहे. मात्र, कल्की २८९८एडी अद्याप शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा विक्रम मोडू शकला नाही. ‘जवान’ चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर ६४०.२५ कोटींचा गल्ला जमवला होता आणि जगभरात ११६० कोटींची कमाई करीत विक्रम रचला होता. आता ज्या प्रकारे चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची घोडदौड सुरू आहे, त्यामुळे प्रभासचा ‘कल्की २८९८एडी’ चित्रपट हा विक्रम मोडेल, असा अंदाज बांधला जात आहे. याचे कारण म्हणजे पुढील आठवड्यात कोणतेही मोठे चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने त्याचा फायदा या चित्रपटाला होऊ शकतो.
Kalki 2898AD पेक्षा जास्त कमाई केलेले चित्रपट कोणते?
‘बाहुबली २ : द कन्क्लुजन’ चित्रपटाने १७८८ कोटींची कमाई केली होती. ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाने १२३० कोटींचा गल्ला जमवला होता. तर ‘केजीएफ : चॅप्टर २’ने १२१५ कोटींची कमाई केली होती. महत्त्वाचे म्हणजे आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाचा विक्रम अद्याप कोणताही चित्रपट मोडू शकलेला नाही. या चित्रपटाने एकूण २,०७० कोटी रुपयांची कमाई करीत विक्रम रचला आहे.
हेही वाचा: उर्वशी रौतेलाचा बाथरुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “असे पब्लिसिटी स्टंट…”
दरम्यान, शुक्रवारी म्हणजेच १९ जुलैला विकी कौशलचा ‘बॅड न्यूज’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, कल्की : २८९८ एडी हा इतर चित्रपटांसाठी आव्हान ठरू शकतो. प्रभासबरोबरच या चित्रपटात दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी, मृणाल ठाकूर, दुलकिर सलमान, विजय देवरकोंडा हे कलाकार अभिनय करताना दिसले आहेत.