‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर यशस्वीपणे राज्य करीत आहे. चाहत्यांपासून ते अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. आता मात्र चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर दिग्दर्शक नाग अश्विन आणि सहकलाकार प्रभास यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये दिशा म्हणते की, विज्ञान आणि भारतीय इतिहासाला इतक्या सुंदर पद्धतीने एकत्र आणून गोष्ट निर्माण केल्याबद्दल नाग अश्विन यांचे मी आभार मानते. सेटवर असताना तुमच्याबरोबर अॅनिमेशनविषयी संवाद साधणे ही माझ्यासाठी पर्वणी होती. सगळ्यांची काळजी घेतल्याबद्दल आणि सर्वांत चांगला सहकलाकार असल्याबद्दल भैरवाची अर्थात प्रभासचीदेखील मी आभारी आहे. त्याबरोबरच तेलुगू चित्रपट निर्मात्या प्रियांका दत्त आणि स्वप्ना दत्त यांच्याबद्दल दिशा लिहिते- तुम्ही या चित्रपटाला सत्यात उतरवले. तुम्ही प्रेरणादायी आहात. पुढे ती म्हणते की, अशा दिग्गज कलाकारांबरोबर काम करणे माझ्यासाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. ज्या कलाकारांनी ही कलाकृती सत्यात उतरवण्यासाठी रात्रीचा दिवस केला, त्यांना सलाम आहे. शेवटी, रॉक्सी या पत्राला जिवंत करण्यासाठी खूप मेहनत घेतलेल्या माझ्या टीम डीचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. मला या सुंदर प्रवासाचा एक भाग बनविल्याबद्दल मी या चित्रपटाशी संबंधित सर्वांची आभारी आहे. हे लिहीत असताना दिशाने प्रभास आणि नाग अश्विन यांचा विमानातील फोटो शेअर केला आहे.
दिशाने ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.
कल्की २८९८ एडी हा चित्रपट ज्या पद्धतीने निर्माण केला आहे, त्या सर्व एकंदरीत बाबी अविश्वसनीय वाटत आहेत. त्यामुळे भारावलेले बॉलीवूडचे अनेक कलाकार नाग अश्विन यांच्या प्रतिभेचे आणि त्यांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडचा लाडका अभिनेता रणवीर सिंह याने हा चित्रपट भारतीय चित्रपटांतील एक उत्तम चित्रपट असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, या चित्रपटाने आपल्या कमाईने याआधीचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हासन, मृणाल ठाकूर, दुलकिर सलमान, दिशा पटानी, विजय देवरकोंडा या दिग्गज कलाकारांनी आपल्या सहज अभिनयाने आपल्या भूमिकांना न्याय देत हा चित्रपट वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरातून प्रेम मिळत आहे. ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात भारतात ४१४.२५ कोटी रुपयांची कमाई केली असून, जगभरात ७०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.