अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंद यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चा होती. पण प्रसिद्ध अभिनेत्याने मात्र या चित्रपटावर टीका केली असून त्याचं ट्वीट सध्या बरंच चर्चेत आहे.
‘पठाण’ ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी ट्वीट करत शाहरुखच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खान देशभक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता जॉन अब्राहम खालनायकाच्या भूमिकेत आहे. एकीकडे शाहरुखच्या चित्रपटाचं सोशल मीडियावर कौतुक होत असलं तरीही अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खानला मात्र हा चित्रपट खूप निकृष्ट दर्जाचा आहे असं वाटतं. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या अभिनेत्याने चित्रपटावर सडकून टीका केली आहे.
आपल्या विचित्र चित्रपट समीक्षांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या केआरकेने ‘पठाण’ ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटावर टीका करण्यास सुरुवात केली होती. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं, “पठाण चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मला धक्काच बसला. मी फक्त एवढंच बोलू शकतो की हा काय फालतू चित्रपट आहे. शाहरुख खान एवढा फालतू चित्रपट कसा काय करू शकतो. जॉन अब्राहमच्या ‘अॅटॅक’ चित्रपटाची कथाही अशीच होती. जो पूर्णतः फ्लॉप ठरला.”
दरम्यान याआधी केआरकेने आपल्या आणखी ट्वीटमध्ये ‘पठाण’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यावर हॉलिवूड चित्रपटातील सीन कॉपी केल्याचा आरोप लावला होता. “सिद्धार्थ एक असा दिग्दर्शक आहे ज्याला स्क्रिप्टबद्दल काहीही समजत नाही आणि तो फक्त परदेशी चित्रपटातील अॅक्शन सीन कॉपी करतो.” असं ट्वीट त्याने केलं होतं. अर्थात केआरके काहीही बोलला तरीही ‘पठाण’ ट्रेलर प्रेक्षकांच्या मात्र पसंतीस उतरला आहे. येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.