शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूडमध्ये एकीकडे चित्रपट फ्लॉप होत असताना शाहरुख मात्र प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे. प्रदर्शनाआधी चित्रपटाला बराच विरोध होऊनही चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळताना दिसत आहे. अशात एका प्रसिद्ध अभिनेत्याने शाहरुख आणि ‘पठाण’बाबत ट्वीट केलं होतं. ज्यावरून त्याला ट्रोल व्हावं लागलं आहे.
चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल आर खानने ‘पठाण’ला मिळत असलेल्या यशानंतर एक ट्वीट केलं आहे. ज्यावरून त्याला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जात आहे. केआरकेने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “मी शाहरुख खानला खूप आग्रह केला होता की त्याने या चित्रपटाचं ‘पठाण’ हे नाव बदलावं. पण हेच नाव चित्रपटासाठी योग्य असल्याचं त्याचं ठाम मत होतं. अखेर त्याने आजही तोच बॉलिवूडचा बादशाह आणि मी त्याच्यासमोर झंडु बाम असल्याचंही सिद्ध केलं आहे.”
केआरकेच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने केआरकेच्या या ट्वीटवर कमेंट करताना लिहिलं, “बरोबर आहे तू सर्वांसाठी डोकेदुखी आहेस” दुसऱ्या एका युजरने ट्रोल करत कमेंट केली, “केआरके आणि एसआरके या दोघांमध्ये हाच फरक आहे.” आणखी एकाने लिहिलं, “तू झंडुबाम आहेस यात मला अजिबात शंका नाही.” याशिवाय आणखी अनेक युजर्सनी केआरकेच्या या ट्वीटवर कमेंट करत त्याला ट्रोल केलं आहे.
आणखी वाचा- शाहरुखला ओळखतच नव्हती ‘पठाण’ची अभिनेत्री, म्हणाली, “चित्रपटाच्या सेटवर कोणीतरी…”
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पठाण चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ३४.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र अद्याप अंतिम आकडे समोर आलेले नाही. तर काही ठिकाणी पठाणने तिसऱ्या दिवशी जवळपास ४१ कोटींची कमाई केल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात १६२ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात या चित्रपटाने २८० ते २९० कोटींच्या कमाईचा आकडा पार केल्याचे बोललं जात आहे.