Happy Birthday Kamal Haasan: दाक्षिणेत सिनेमा पाहणं ही परंपरा आहे. तिथे कलाकारांना देवही मानलं जातं आणि नेतेही. जेमिनी गणेशन, जयललिता, एनटीआर अशी कितीतरी नावं घेता येतील. त्यातलंच एक महत्त्वाचं नाव आहे कमल हासनचं. कमल हासन हा एक सर्जनशील आणि हरहुन्नरी कलावंत आहे. हिंदी सिनेसृष्टीचा इतिहास लिहिला गेला तर त्यात कमल हासन आणि रजनीकांत हे अध्याय खूप महत्त्वाचे असतील. कमल हासनने कामच तेवढं करुन ठेवलं आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अभिनय करणाऱ्या या कलावंताने मागची साठ वर्षे सिनेमासाठीच दिली आहेत. तरीही मी अजून विद्यार्थीच आहे आणि शिकतो आहे असं कमल हासनने सांगितलं आहे.

वयाच्या सहाव्या वर्षीच राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक

कमल हासनचा जन्म ७ नोव्हेंबर १९५४ चा. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने बाल कलाकार म्हणून सिनेमात काम केलं. तेव्हापासून तो काम करतोच आहे. अभिनेता, पटकथा लेखक, पार्श्वगायक, निर्माता अशा विविध भूमिकांमधून तो लिलया वावरला आहे. तमिळ, मल्याळम, हिंदी, तेलगु, कानडी आणि बंगाली अशा भाषांमध्ये त्याने चित्रपट केले आहेत. वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान सिनेमात आणण्यासाठीही कमल हासन ओळखले जातात. कमल हासनला त्याच्या चित्रपट कारकिर्दीच्या दरम्यान चार राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि फिल्मफेअर अशा पुरस्कारांनी गौरवलं गेलं आहे. ‘कथ्थूर कन्नमा’ या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते कमल हासनला सुवर्ण पदक मिळालं होतं. इतके सगळे पुरस्कार मिळाले असले तरीही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचं प्रेम हा सर्वात मोठा पुरस्कार मी मानतो असं कमल हासनने एका मुलाखतीत सांगितलं होतं. १९७५ मध्ये आलेला ‘अपूर्व रागागंल’ हा कमल हासनचा पहिला सिनेमा होता. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या प्रेमात एक तरुण पडतो आणि तिच्यासाठी बंड करतो अशी या सिनेमाची कथा होती. या सिनेमातली मध्यवर्ती भूमिका कमल हासनने साकारली. पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला. त्यानंतर मग कमल हासनने मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या चित्रपटांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही फॉर्म्युला न वापरता आपलाच एक फॉर्म्युला घेऊन ते चित्रपट आले.

aditya roy kapoor
रुपेरी पडद्यावरील सच्चा प्रेमी आदित्य रॉय कपूर खऱ्या आयुष्यात पडला ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
sonu nigam met a child fan beatboxing
Video : छोट्या चाहत्यासाठी रस्त्यात थांबला सोनू निगम, टॅलेंटचं कौतुक केलं अन्…; त्याच्या ‘या’ कृतीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Kamal Haasan Birth day
कमल हासन आणि रती अग्निहोत्री, एक दुजे के लिये सिनेमातील दृश्य (फोटो सौजन्य-फेसबुक )

‘एक दुजे के लिये’ हा अभिनेता म्हणून कमल हासनचा पहिला हिंदी चित्रपट. दाक्षिणात्य घरातला तरुण आणि उत्तर भारतीय तरुणी यांच्यातली ही प्रेम कहाणी होती. या सिनेमातली गाणी प्रेक्षकांना प्रचंड भावली. ‘वासू आणि सपना’ म्हणजेच कमल हासन आणि रती अग्निहोत्रीची जोडी सुपरहिट ठरली. प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर उचलून धरला होता. यानंतर १९८३ ला ‘सदमा’ हा सिनेमा आला.
या सिनेमात कमल हासन आणि श्रीदेवी होते.

‘सदमा’तला अभिनय डोळ्यात पाणी आणणारा

‘ट्रॅजिडी’ या प्रकारात मोडणारा ‘सदमा’ हा चित्रपट बालू महेंद्रा यांनी दिग्दर्शित केला होता. तर इलियाराजांनी या सिनेमाचं संगीत दिलं होतं. ‘ऐ जिंदगी गले लगा ले…’ आणि “सुरमयी अखियोंमें..” ही अजरामर गाणी याच चित्रपटातली. एक मुलगी आहे जिचा अपघात होतो आणि डोक्याला मार लागतो. तिच्या डोक्याला मार लागल्याने ती लहान मुलांसारखी वागू लागते. त्यानंतर तिच्या आयुष्यात सोमू नावाचा शिक्षक येतो. तो तिचा सांभाळ करतो, तिला बरं करतो. शेवटी ती त्याला ओळखत नाही. साधारण अशी या सिनेमाची कथा होती. या सिनेमात कमल हासन आणि श्रीदेवी यांची केमिस्ट्री तर पाहायला मिळालीच.. पण शेवटच्या पाच मिनिटांच्या क्लायमॅक्सने कमल हासनने डोळ्यांतून पाणी काढलं. आजही तो सीन पाहिला की आपल्या अंगावर काटा येतो. यानंतर कमलचा महत्त्वाचा सिनेमा ठरला तो ‘सागर’

Kamal Haasan Birth day
सदमा सिनेमातलं दृश्य (फोटो सौजन्य-फेसबुक)

‘सागर’ सिनेमात ऋषी कपूर, डिंपल आणि कमल हासन यांच्या भूमिका होत्या. ऋषी कपूर आणि डिंपल हे दोन बडे स्टार असूनही कमल हासनने लक्षवेधी भूमिका केली होती. प्रेमाचा त्रिकोण या सिनेमात पाहण्यास मिळाला होता. या चित्रपटामधली गाणी आजही आपल्या स्मरणात आहेत. खास करुन ‘सच मेरे यार है..’ हे गाणं तर त्यावेळच्या प्रत्येक प्रेमभंग झालेल्या तरुणाच्या ओठी असलेलं गाणं ठरलं होतं.

चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण प्रयोग

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये कमल हासन पडद्यावर राज्य करत होताच. पण जेव्हा त्याने हिंदी सिनेमा केला तेव्हा त्याने वैविध्यपूर्ण प्रयोग केले. ‘अप्पू राजा’ सिनेमात एक बुटका कमल हासन आणि एक नेहमीचा कमल हासन असे पाहण्यास मिळाले. गुडघे बांधून कॅमेरा अँगलने स्वतःला बुटकं करण्याची किमया नंतर कुठल्या कलाकाराने करुन दाखवली नाही. कमल हासनने या चित्रपटात केलेली दुहेरी भूमिका प्रेक्षकांना आवडलीच. पण हा सिनेमा आला तेव्हा तंत्रज्ञान आत्ताइतकं प्रगत नव्हतं. बुटका कमल हासन कसा साकारला असेल? हा प्रश्न तेव्हा सगळ्यांनाच पडला होता. त्यासाठी कमल हासने अभ्यास केला होता आणि बुटक्या कमल हासनसाठी तसा सेट लावून मग कॅमेराच्या अँगलने चित्रपट शूट केला होता. २० दिवसांचं शुटिंग फक्त बुटक्या रुपासाठी होतं. मात्र ते इतकं लिलया मिसळलं की कुठेही ती फ्रेम वेगळी आणि ही फ्रेम वेगळी असं वाटत नाही. पुष्पक हे त्याच्या सिनेमांचं आणखी एक वेगळं उदाहरण.

पुष्पकची कथा लिहिली गेली होती

पुष्पक सिनेमा हा १९८७ मध्ये आला होता. हा सिनेमा म्हणजे चित्रपटसृष्टीतला माईलस्टोन आहे. कारण मुकपटांचा काळ संपल्यानंतर मूकपट तयार करण्याचं धाडस कुणीही केलं नव्हतं जे कमल हासनने केलं आणि यशस्वीही करुन दाखवलं. ‘ब्लॅक कॉमेडी’ ती देखील एकही शब्द न बोलता.. हे फक्त ‘पुष्पक’ने दाखवून दिलं. “हा सिनेमा आम्ही लिहिला होता” असं कमल हासनने सांगितलं होतं. त्यावर सिनेमात एकही संवाद नाही मग मूकपट तयार करताना तुम्ही लिहिलं काय? असा प्रश्न विचारला असता कमल हासन म्हणाला, “मूकपट कसा लिहितात? हे शिकण्यासाठीच आम्ही हा चित्रपट लिहिला होता.” वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आजही प्रेक्षकांना भावतो.

चाची आणि हिंदुस्थानीचं वेगळेपण

‘चाची ४२०’, ‘हिंदुस्थानी’ यामध्येही खास प्रयोग करण्यात आले. चाची ४२० मध्ये कमल हासनने चक्क ‘चाची’ची म्हणजेच स्त्री भूमिका साकारली. या मेक अपसाठी कमल हासनला ६ तास लागत असत. तब्बू, अमरिश पुरी, परेश रावल, ओम पुरी अशा दिग्गज कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. जय आणि लक्ष्मी गोडबले या दोन्ही पात्रांच्या भूमिकेत कमल हासन होता. Mrs. Doubtfire या इंग्रजी सिनेमाचा धागा घेऊन चाची ४२० साकारण्यात आला होता. रॉबिन विल्यम्सने केलेली स्त्री भूमिका जितकी स्मरणात आहे त्यापेक्षा कैकपटीने जास्त कमल हासनची चाची स्मरणात राहिली आहे. ‘हिंदुस्थानी’मध्येही कमल हासनने असा प्रयोग केला की सगळेच थक्क झाले. मुलगा आणि वडील अशा दुहेरी भूमिकेत कमल हासन होता. मात्र स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत असलेल्या म्हणजेच वृद्ध कमल हासनला ओळखणं जवळपास अशक्य होतं. हा मेक अप करण्यासाठीही त्याला खूप वेळ लागत असे. अशा पद्धतीने स्वतःवर प्रयोग करत करत हा अभिनेता पुढे गेला असं कायमच दिसतं.

Kamal Haasan Birth Day
चाची ४२० सिनेमातलं दृश्य (फोटो-फेसबुक)

फसलेले प्रयोग

प्रयोग म्हटला की फसणंही आलंच. ‘हे राम’ मधला कमल हासनने साकारलेला ‘साकेतराम’ काल्पनिक होता. तसंच मूळ सिनेमापेक्षा त्यातल्या राणी मुखर्जीबरोबरच्या हॉट दृश्यांची चर्चा जास्त झाली होती. ‘अभय’ या सिनेमातही कमल हासनने दोन भूमिका साकारल्या. अभय हा सायको बटबटीत झाल्याने आणि सिनेमाला उत्तम पटकथेची जोड नसल्याने हा सिनेमाही कमाल करु शकला नाही. विश्वरुपम आणि विश्वरुपम २ या दोन सिनेमांमध्ये तर कमल हासन १० भूमिकांमध्ये दिसला. मात्र बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट फार कमाल करु शकले नाहीत. हे सगळं झालं असलं तरीही या सर्जनशील अभिनेत्याने प्रयोग करणं सोडलेलं नाही हे विशेष. गेल्या वर्षी आलेला ‘विक्रम’ हा चांगला सिनेमा होता.

हिंदुस्थानी २ ची प्रतीक्षा

आता ‘हिंदुस्थानी’चा सिक्वल येतो आहे. त्यात कमल हासन काय कमाल दाखवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कमल हासनचा ‘हिंदुस्थानी’ हा सिनेमा तांत्रिकदृष्ट्या पुढारलेला होता. तब्बल २७ वर्षांनी एखाद्या सिनेमाचा सिक्वल येणं ही किमयाही कमल हासनच घडवू शकतो. त्यामुळे आता या चित्रपटात कुठले स्पेशल इफेक्ट बघायला मिळणार हे पाहणं रंजक असेल.

कमल हासन आणि वाद

कमल हासन राजकारणातही आला आहे. मक्कल निधी मय्यम या नावाने त्याने पक्ष स्थापन केला. तसंच कमल हासन याने काही मुद्द्यांवर भाष्यही केलं ज्यामुळे वाद निर्माण झाला. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हिंदू होता त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. असं वक्तव्य कमल हासनने केलं होतं त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. तसंच कमल हासनला टीका आणि ट्रोलिंगही सहन करावं लागलं होतं. तसंच सनातन धर्मावरुन उदयनिधी स्टॅलिन यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरही त्याने उदयनिधी स्टॅलिनला पाठिंबा दिला होता. एका तरुण मुलाला सनातन धर्माबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेवरुन टार्गेट केलं जात असल्याचं कमल हासन म्हणाला होता. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरही कमल हासनचं वक्तव्य समोर आलं होतं. प्रचारासाठी काही चित्रपट तयार केले जातात. मी त्यांचा विरोधच करत आलो आहे. फक्त सिनेमाची गोष्ट खरी असून चालत नाही ते वास्तवातही सत्य असावं लागतं. असं वक्तव्य कमल हासनने केलं होतं.

रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची वैविध्यपूर्ण प्रयोगशील चित्रपटांची कमाल करणारा कमल हासन हा सगळ्यांनाच आपलासा वाटत आला आहे. त्याचा खास असा एक प्रेक्षक वर्ग त्याने तयार केला आहेच. शिवाय त्याच्या असण्याने तो संपूर्ण पडदा व्यापून टाकतो हेदेखील त्याने अनेकदा दाखवून दिलं आहे. या हरहुन्नरी कलावंताला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!