दिव्या भारती ही ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. कमी वयातच दिव्याने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली होती. ती थोडी श्रीदेवींसारखी दिसायची, त्यामुळे त्या दोघी बहिणी असल्याचंही म्हटलं जायचं. पाचव्या मजल्यावरून पडून दिव्या भारतीचं १९ व्या वर्षी निधन झालं होतं. तिचं निधन हा एक अपघात होता, असं अभिनेता कमल सदानाने म्हटलं आहे. तिच्या मृत्यूआधी आपण एका चित्रपटाचं शूटिंग एकत्र संपवलं होतं, ती खूप आनंदी होती, असंही तो म्हणाला.
कमल सदानाने नुकतीच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यूबाबतही प्रतिक्रिया दिली. दिव्याचं निधन ही आपल्यासाठी खूप दुःखद घटना होती, असं त्याने म्हटलंय. “दिव्या खूप प्रतिभावान अभिनेत्री होती. तिच्या बरोबर काम करताना खूप चांगलं वाटायचं. ती नेहमी आनंदी असायची. ती खूपच धाडसी होती,” असं कमल म्हणाला.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस पूर्ण, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या
“दिव्या श्रीदेवींची उत्तम नक्कल करायची. तिच्या निधनाबद्दल मला आजही विश्वास बसत नाही. माझ्यासाठी ही खूप धक्कादायक बातमी होती. तिच्या मृत्यूच्या दोन-तीन दिवस आधी आम्ही एकत्र शूटिंग संपवलं होतं. जेव्हा मला कोणीतरी फोन करून दिव्याच्या मृत्यूची माहिती दिली तेव्हा मला विश्वास बसला नाही आणि हे कसं शक्य आहे, असं मी त्या व्यक्तीला विचारत होतो,” असं कमल म्हणाला.
दिव्याबरोबर मी शूटिंग केलं होतं, तेव्हा सगळं काही ठिक होतं, असं कमलने म्हटलंय. तो म्हणाला, “ती आनंदी होती. ती त्यावेळची सर्वात टॉपची अभिनेत्री होती. तिच्याजवळ बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स होत्या. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी असं मला वाटत नाही. आमची खूप चांगली मैत्री होती, तिने दारू प्यायली होती. त्यामुळे नशेत ती फिरत असावी आणि त्यातच तोल जाऊन पडली असावी, असं मला वाटतं.” तिच्या हत्येच्या बातम्या खोट्या असल्याचं कमलने सांगितलं. दिव्या व कमल यांनी ‘रंग’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट १९९३ साली अभिनेत्रीच्या निधनानंतर प्रदर्शित झाला होता. दिव्याचा मृत्यू एप्रिल १९९३ मध्ये झाला होता.
दिव्याच्या वडिलांनी म्हटलं होतं की, “आत्महत्या किंवा खुनाचा प्रश्नच येत नाही. तिने तोडी दारू प्यायली होती. ती डिप्रेशनमध्ये नव्हती, जे घडलं तो एक अपघात होता. ती बाल्कनीच्या काठावर बसली, तिचा तोल गेला आणि ती पडली. दुःखद गोष्ट म्हणजे, तिच्याशिवाय सर्व फ्लॅटमध्ये बाल्कनीत ग्रील्स होत्या. बाल्कनीच्या खाली पार्किंगमध्ये नेहमी गाड्या खाली उभ्या असायच्या पण त्या रात्री एकही गाडी नव्हती आणि ती थेट जमिनीवर पडली.