लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार व अभिनेत्री कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर एका महिला सुरक्षारक्षकाना थोबाडीत लगावली. मारहाण सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षक कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आलं आहे. मारहाण झाल्याप्रकरणी सिनेइंडस्ट्रीतील कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही, यावर कंगना यांनी नाराजी व्यक्त करत सेलिब्रिटींनी सुनावलं आहे.
कंगना रणौत यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बॉलीवूडमधील सेलिब्रिटींनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी ‘ऑल आईज ऑन राफाह’ ही पोस्ट अनेकांनी शेअर केली होती. त्या पोस्टचा उल्लेख करत कंगना यांनी सेलिब्रिटींवर टीका केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर केलेली पहिली पोस्ट डिलीट केली आणि नंतर दुसरी पोस्ट केली. त्यांच्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Video: कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला बक्षीस देणार, व्यावसायिकाने केली घोषणा
कंगना यांनी पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, “प्रिय फिल्म इंडस्ट्री, तुम्ही सर्वजण माझ्यावर विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा आनंद साजरा करत आहात किंवा त्यावर पूर्ण मौन बाळगून आहात. पण लक्षात ठेवा, उद्या तुम्ही आपल्या देशात किंवा जगात कुठेही रस्त्यावर फिरत असाल, तेव्हा काही इस्रायली/पॅलेस्टिनी तुमच्यावर किंवा तुमच्या मुलावर हल्ला करतील, तेही फक्त याचसाठी की तुम्ही सर्वजण राफाहच्या समर्थनार्थ उभे होता होतात, त्यावेळी तुम्ही पाहाल की मी तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढेन… जर एखाद्या दिवशी तुम्हाला वाटेल मी का आणि मी कुठे आहे, तर लक्षात ठेवा तुम्ही मी नाहीत.”
काही वेळाने कंगना रणौत यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि दुसरी पोस्ट शेअर केली. “‘ऑल आइज ऑन राफाह’ गँग हे तुमच्याबरोबर आणि तुमच्या मुलांबरोबरही घडू शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्यावर झालेला दहशतवादी हल्ला सेलिब्रेट करता तेव्हा तुमच्याबरोबरही हे घडेल, त्या दिवसासाठी तयार राहा,” असं त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं.
नेमकी घटना काय?
चंदीगढ विमानतळावर गुरुवारी सुरक्षा तपासणीदरम्यान कुलविंदर कौर या सीआयएसएफच्या सुरक्षारक्षक महिलेने कर्तव्यावर असताना कंगना रणौत यांना कानशिलात लगावली. कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन झालं होतं, त्यासंदर्भात कंगना यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाराज असलेल्या कुलविंदरने हे कृत्य केलं. कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिला प्रत्येकी १०० रुपये घेऊन तिथे बसल्या आहेत, असं कंगना म्हणाल्या होत्या. तसेच कंगना यांनी शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटलं होतं. यामुळे आपण मारल्याचं कुलविंदर कौर व्हायरल व्हिडीओत म्हणताना दिसते. या घटनेनंतर कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आलं आहे.