बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या पुन्हा चर्चेत आहे. तिचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू झाल्यापासून कंगनाने पुन्हा तिची परखड स्पष्ट मतं मांडायला सुरुवात केली आहे. अभिनयाबरोबरच कंगना तिच्या या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. नुकतंच तिने एका ट्वीटमधून अभिनेता आमिर खानवर टीका केली आहे. आमिरने कंगनाचं कौतुक करूनही कंगनाने त्याच्यावर निशाणा साधला आहे.
नुकतंच प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आमिर खानने हजेरी लावली. यादरम्यान त्याने तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी आणि मीडियाशी मनमोकळा संवाद साधला. या कार्यक्रमात आमिरला एक प्रश्न विचारण्यात आला की “जर शोभा डे यांच्यावर एखादा चरित्रपट काढायचा असेल तर कोणती अभिनेत्री त्यासाठी योग्य असेल?” या प्रश्नामुळेच आमिर अडचणीत सापडला.
आणखी वाचा : ‘शार्क टँक इंडिया’च्या इतिहासात प्रथमच घडली ‘ही’ घटना; पैशांऐवजी तरुणाने शार्क्सकडे केली ‘या’ गोष्टीची मागणी
या प्रश्नाचं उत्तर देताना आमिर खानने दीपिका पदूकोण, प्रियांका चोप्रा, अलिया भट्ट या काही अभिनेत्रींची नावं घेतली. तेव्हा शोभा डे यांनी आमिरला कंगनाची आठवण करून दिली. त्यावर आमिर म्हणाला, “ही कंगनापण तुमची भूमिका उत्तम करू शकते, ती उत्तम अभिनेत्री आहे, ती विनोदी भूमिका छान करते, नाट्यमय भूमिका उत्कृष्ट करते.”
आमिरची ही व्हिडिओ क्लिप कंगनाने शेअर करत ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये कंगना म्हणाली, “बिचारा आमिर खान, मी एकमेव अभिनेत्री आहे जीने ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे जे त्याने उल्लेख केलेल्या कोणालाही मिळलेला नाही आणि हे तो सोयीस्कररित्या विसरतो आहे किंवा तसं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शोभा मॅडम धन्यवाद, तुमची भूमिका साकारायला मला नक्की आवडेल.” गेल्याचवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरूनसुद्धा कंगनाने आमिरवर चांगलीच टीका केली होती.