Emergency Teaser : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने नुकत्याच निर्मिती केलेल्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाची जबरदस्त चर्चा आहे. याबरोबरच कंगनाच्या आगामी चित्रपटांचीही बरीच चर्चा आहे. त्यापैकी बहुप्रतीक्षित अशा ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. नुकताच कंगनाने तिच्या या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा नवा टीझर शेअर केला आहे जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीझरमध्ये १९७५ दरम्यान देशभरात लागू केलेल्या आणीबाणीची अन् तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची गोष्ट उलगडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यावेळी देशात निर्माण झालेली अराजकता, सामान्य जनतेमधील असंतोष, विरोधी पक्षाच्या नेत्यांची होणारी धरपकड, ठिकठिकाणी होणारा हिंसाचार हे सगळं चित्रण या टीझरमध्ये अगदी समर्पकरित्या दाखवण्यात आलं आहे.
आणखी वाचा : “माझ्या चित्रपटाचे नुकसान…” चित्रपट माफियावर पुन्हा एकदा भडकली कंगना रणौत
टीझरमध्ये हा संपूर्ण काळ हा भारतीय इतिहासातील सर्वात अंधकारमय काळ अशी नोंद पाहायला मिळत आहे. याबरोबरच टीझरमध्ये कंगनाच्या डायलॉग्सचीदेखील प्रचंड चर्चा होत आहे. “या देशाची रक्षा करण्यापासून कुणीच मला थांबवू शकत नाही, कारण इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया.” हा संवाद टीझरच्या शेवटी कंगनाच्या तोंडी आपल्याला ऐकायला मिळतो.
कंगना या चित्रपट इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील कंगनाच्या लूकचीही जबरदस्त चर्चा आहे. याबरोबरच अनुपम खेर, महिमा चौधरी, सतीश कौशिक, मिलिंद सोमणसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कंगनाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून २४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे.