‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाची कथा काही महिलांची आहे, ज्यांना धर्मांतराद्वारे मुसलमान करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले गेले. या चित्रपटावर काही जण टीका करत आहेत, तर काही या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. काहींनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. याबाबत अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. आता शबाना आझमी यांनी केलेल्या ट्वीटवर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपट असं म्हणून या चित्रपटात करण्यात आलेले दावे खोटे आहेत, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तर आज एक ट्वीट करत शबाना आझमी यांनी याबाबत त्यांचं मत व्यक्त केलं होतं. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, “जे ‘द केरला स्टोरी’वर बंदी घालण्याची भाषा करतात, ते आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर बंदी घालू इच्छिणाऱ्यांइतकेच चुकीचे आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने एकदा चित्रपटाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर कोणालाही अतिरिक्त घटनात्मक अधिकार बनण्याचा अधिकार नाही.”

आणखी वाचा : चित्रपटगृहानंतर ‘द केरला स्टोरी’ लवकरच येणार OTT वर! जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार चित्रपट

तर आता हे ट्वीट रिट्वीट करत कंगनाने त्यांच्या या बोलण्याला सहमती दर्शवली. तिने लिहिलं, “हा अगदी बरोबर मुद्दा आहे. पण सत्य हे आहे की, कोणीही ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली नव्हती. तर विविध कारणांमुळे लोकांना हा चित्रपट पाहायचा नव्हता. हा अत्यंत गाजलेल्या हॉलीवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम’चा रीमेक आहे हे त्यापैकी महत्त्वाचं कारण होतं, जो चित्रपट प्रेक्षकांनी आधीच पाहिला होता.”

हेही वाचा : शिक्षण अर्धवट सोडून अभिनय क्षेत्रात आलेली ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या तिची संपत्ती

कंगनाचं हे ट्वीट आता खूप चर्चेत आलं आहे. या ट्वीटवर कमेंट करत नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक जण तिच्या या बोलण्यावर सहमती दर्शवत आहेत. तर दुसरीकडे अनेक नेटकरी ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट चांगला असल्याचं म्हणत कंगनाच्या या बोलण्यावर टीका करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut expressed her opinion about shabana azmis view about the kerala story controversy rnv