मागील काही महिन्यांत अनेक बॉलीवूड कलाकार आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात करीत लग्नबंधनात अडकले आहेत. आधी रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी आणि आता क्रिती खरबंदा व पुलकित सम्राट यांनी लग्नगाठ बांधली. आता बॉलीवूडची क्वीन कंगना रणौतही तिच्या नवीन आयुष्याला लवकरच सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कंगनाने आपल्या लग्नाचे कपडेदेखील निवडले असल्याची चर्चा सुरू आहे. ‘रेडिट’वर आलेल्या माहितीनुसार, कंगना आपल्या लग्नातील पोशाख एका ड्रेस डिझायनरकडून तयार करून घेणार आहे. कंगनाचा हा ड्रेस डिझायनर इंडस्ट्रीमधलाच आहे; पण तितकासा सुप्रसिद्ध नाही. कंगनाच्या लग्नाबद्दलच्या गोष्टी खासगी ठेवण्यात आल्या आहेत. कंगना कोणाशी लग्न करणार आहे हे अजून जाहीर झालं नसलं तरी तिचा बॉयफ्रेंड आहे, असं तिनं आधी कबूल केलं होतं.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कंगनानं हजेरी लावली होती. त्यादरम्यान, कंगना आणि निशांतचे अयोध्येतील राम मंदिरातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यामुळेच कंगना निशांतला डेट करीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, अभिनेत्रीनं या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आणि ती दुसऱ्याच कोणाला तरी डेट करतेय; परंतु तो निशांत नाही, असा खुलासा तिनं केला होता.
हेही वाचा… ‘गुलाबी साडी…’, मराठी गाण्यावर आजीसह थिरकली अदा शर्मा; व्हिडीओ व्हायरल
निशांत पिट्टीबरोबर कंगनाचं अफेअर असल्याचा दावा करणाऱ्या मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर करीत कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, “माझी मीडियाला नम्र विनंती आहे की, कृपया चुकीची माहिती पसरवू नका. निशांतजी विवाहित आहेत आणि मी दुसऱ्या कोणाला तरी डेट करीत आहे. योग्य वेळ आल्यावर मी त्याबद्दल सांगेन. एका महिलेनं एखाद्या पुरुषाबरोबर फोटो काढल्यानं रोज तिचं नाव एखाद्या नवीन पुरुषाशी जोडणं योग्य नाही.”
हेही वाचा… अनुष्का शर्मा लेक अकायबरोबर भारतात परतणार? IPL मध्ये पती विराटला करणार सपोर्ट
मध्यंतरी कंगना एका परदेशी व्यक्तीबरोबर हातात हात धरून चालताना दिसली होती. तेव्हा तो तिचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. कंगना स्पष्टवक्ती आहे आणि प्रत्येक गोष्ट ती सोशल मीडियावर शेअर करते. अशात तिच्या लग्नाची बातमी ती चाहत्यांपासून का लपवून ठेवेल, असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. कंगनानं यापूर्वी तिच्या लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती, “प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की, तिनं लग्न करावं आणि तिचं स्वत:चं कुटुंब असावं. मला कुटुंबात सगळ्यांबरोबर राहणं फार आवडतं. मला नक्कीच लग्न करायचं आहे आणि लग्न करून एका कुटुंबात सामील व्हायचं आहे. येणाऱ्या पाच वर्षांआधीच माझ लग्न होईल. अरेंज आणि लव्ह मॅरेजचं मिश्रण असेल, तर फार बरं होईल.”
हेही वाचा… ठरलं तर मग : कोर्टाची सुनावणी अन् महिपतला अटक; अर्जुन आणि सायलीने उघड केलं सत्य, पाहा प्रोमो
दरम्यान, कंगनाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, कंगना ‘इमर्जन्सी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.