बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आगामी ‘तेजस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् लोकांनाही तो पसंत पडला आहे. याबरोबरच कंगनाच्या आगामी चित्रपटांचीही बरीच चर्चा आहे. त्यापैकी बहुप्रतीक्षित अशा ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. काही महिन्यांपूर्वी कंगनाने तिच्या या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा नवा टीझर शेअर केला होता जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
या ट्रेलरमधील कंगनाच्या लूकची तिच्या देहबोलीची तसेच संवादफेकीची खूप प्रशंसा झाली. याबरोबरच कंगनाने या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोजसुद्धा शेयर केले होते. टीझरपासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते, पण आता प्रेक्षकांना या चित्रपटासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे, कारण हा चित्रपट आता २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
आणखी वाचा : भायखळा जेल ते ‘बिग बॉस १७’ – जिग्ना वोराचा पुढील प्रवासाबद्दल खुलासा; म्हणाली, “मी लढणारी…”
नुकतंच कंगनाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये कंगना लिहिते, “मला एक महत्वाची घोषणा करायची आहे. इमर्जन्सि हा माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे ज्यात माझा प्रचंड वेळ आणि पैसा गुंतला आहे अन् यातून मला बरंच काही शिकायलाही मिळालं आहे. तुम्ही याच्या टीझरला जो उदंड प्रतिसाद दिला त्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे.”
पुढे कंगना लिहिते, “मला लोक सतत याच्या प्रदर्शनाची तारखेबद्दल विचारत आहे, आम्ही याची तारीख २४ नोव्हेंबर २०२३ ठरवली होती. परंतु माझे एकापाठोपाठ एक आलेले चित्रपट यामुळे यात काही बदल होणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये प्रदर्शित करण्याचं ठरवलं आहे. अद्याप याची प्रदर्शनाची तारीख नक्की झालेली नाही. तुमची उत्सुकता, आशीर्वाद असेच कायम असू द्या.”
कंगना या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच अनुपम खेर, महिमा चौधरी, सतीश कौशिक, मिलिंद सोमणसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनयासह कंगनाने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.