देशाचं नाव इंडिया बदलून भारत ठेवण्याचा मुद्दा खूपच गाजला. या मुद्द्यावर अनेक राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींनीही आपली मतं मांडली होती. राजकीय विषयांवर आपली मतं मांडणारी कंगना रणौत हिनेही त्यावेळी ट्विटरवर या मुद्द्यावर भाष्य केलं होतं त्यावेळी तिने इंडिया व भारत या दोन्ही शब्दांचा अर्थही सांगितला होता. आता पुन्हा एकदा तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, “एक काळ असा होता जेव्हा मला भारतीय दिसायचं नव्हतं. कारण तेव्हा आपला देश गरीब देश मानला जात असे. आता मला माझ्या संस्कृतीचा अभिमान आहे आणि आता मला साडी नेसायला आवडते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्या संस्कृतीचे महत्त्व कळते, तेव्हा तुमच्याकडे ती स्वीकारण्याचा पर्याय असतो. आपल्या देशातील आता लोक विवेकाने वागू लागले आहेत. त्यांना जे व्हायचे आहे ते ते निवडू शकतात. कोणीही तुमच्यावर काहीही लादण्याची गरज नाही.”
कंगना पुढे म्हणाली, “आता मला भारत म्हणणं चांगलं वाटतं, पण कधी कधी माझी जीभ घसरते आणि मी इंडिया म्हणते. मी त्या नावाचा तिरस्कार करत नाही आणि घृणाही करत नाही. तोही आपला भूतकाळ आहे.”
कंगनाने सांगितला होता दोन्ही शब्दांचा अर्थ
हा मुद्दा ताजा असताना कंगनाने ट्विटरवर लिहिलं होतं, “इंडिया या नावात प्रेम करण्यासारखे काय आहे? सर्वात आधी तर त्यांना ‘सिंधू’ चा उच्चार करता येत नव्हता म्हणून त्यांनी नदीचं नाव ‘इंडस’ केले. मग कधी हिंदोस, कधी इंदोस अशी मोडतोड करून इंडिया शब्द बनवला. महाभारताच्या काळापासून कुरुक्षेत्राच्या महायुद्धात भाग घेतलेली सर्व राज्ये भारत नावाच्या एका खंडाखाली यायची. मग ते आम्हाला इंदू-सिंधू का म्हणत होते?” असा सवाल तिने केला होता.
कंगनाने पुढे लिहिलं, “भारत हे नाव खूप अर्थपूर्ण आहे, इंडियाचा अर्थ काय? मला माहित आहे की ते आम्हाला रेड इंडियन म्हणायचे, कारण जुन्या इंग्रजीमध्ये इंडियन म्हणजे फक्त गुलाम, ते आम्हाला इंडियन म्हणायचे कारण ब्रिटिशांनी आम्हाला दिलेली ही नवीन ओळख होती. जुन्या काळातील शब्दकोषांमध्येही इंडियन म्हणजे गुलाम असं म्हटलं जायचं. आता यात बदल करण्यात आला आहे. हे आमचे नाव नाही, आम्ही भारतीय आहोत, इंडियन नाही,” असं कंगनाने म्हटलं होतं.