बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या ट्विटर अकाऊंटमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी मे २०२१ मध्ये कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. ट्विटर कंपनीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याने तिच्यावर ही कारवाई झाली होती. यानंतर हल्लीच अमेरिकन उद्योजक एलॉन मस्क यांना ट्विटरचा मालकी हक्क मिळाल्यानंतर त्याने ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्याबरोबर काही अधिकाऱ्यांना पदावरुन काढून टाकले. या घटनेनंतर कंगनाला तिचे अकाऊंट पुन्हा मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. नुकतंच कंगनाने तिचे ट्विटर अकाऊंटबद्दल स्पष्टपणे भाष्य केले.

कंगनाने नुकतंच आजतक या वृत्तवाहिनीच्या ‘पंचायत आजतक’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये कंगनाने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी तिने नेहमीप्रमाणे तिच्या खरमरीत शैलीत उत्तरं दिली. ट्विटर, बॉलिवूड, नेपोटीजम, दाक्षिणात्य चित्रपट, राजकारण अशा विविध गोष्टींवर तिने तिचे मत मांडले.
आणखी वाचा : CID मालिकेतील अभिनेत्याच्या दुचाकीचा अपघात, शूटींगसाठी जात असताना घडली घटना

या मुलाखतीत कंगनाला तिच्या ट्विटर अकाऊंटबद्दल आणि एलॉन मस्कबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “नुकतंच एलॉन मस्कला ट्विटरचा मालक झाला आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही ट्विटरवर पुन्हा सक्रीय होऊ शकता?” असे तिला विचारण्यात आले. त्यावर तिने फार हसत हसत उत्तर दिले.

“मी ट्विटरवर एक वर्षासाठी होते. पण एक वर्षही ट्विटर मला सहन करु शकले नाही. बघा विचार करा. लोक दहा वर्षे ट्विटरवर सक्रीय आहेत. त्यानंतर मी इन्स्टाग्रामवर सक्रीय झाले. मला या मे महिन्यात इन्स्टाग्रामवर येऊन वर्ष झालं आहे. पण त्यावरही मला ३ वेळा नोटीस आली आहे. त्यानंतर मात्र मी स्वत: इन्स्टाग्राम वापरतच नाही. माझी टीम त्या सर्व गोष्टी पाहते आणि जेव्हापासून माझ्या टीमने इन्स्टाग्राम चालवणे सुरु केले, तेव्हाासून कोणाला काहीही तक्रार नाही. सर्व काही ठीक चालले आहे.

जर मला माझे ट्विटर अकाऊंट परत मिळाले तर तुम्हाला मसाला मिळेल. तुमच्या आयुष्यात खळबळ वाढेल. ट्विटर हे इतर माध्यमांपेक्षा अधिक प्रभावी आहे. या ठिकाणी प्रत्येक गोष्टींवर चर्चा केली जाते. पण इन्स्टाग्राम हे फक्त फोटोंपुरते मर्यादित आहे, असे मला वाटते”, असे कंगना रणौत म्हणाली.

आणखी वाचा : रितेश देशमुखच्या अडचणीत वाढ, ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाचे पोस्टर कॉपी केल्याचा गंभीर आरोप

दरम्यान अमेरिकन उद्योजक एलॉन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विटरचे शेअर्स विकत घेतले होते. नुकतंच त्याचा हा करार पूर्ण झाला. त्यानंतर त्यांच्याकडे कंपनीची मालकी सोपवण्यात आली. मालकी हक्क मिळाल्यानंतर एलॉन यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासमेत अन्य काही अधिकाऱ्यांना पदावरुन काढून टाकले. तसेच भविष्यामध्ये अजून लोकांची कंपनीमधून हकालपट्टी होऊ शकते असेही म्हटले आहे. कंगना रणौतने त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Story img Loader