श्रद्धा वालकर हत्याकांडाची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. श्रद्धाच्या बॉयफ्रेंडने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करत त्याची विल्हेवाट लावली. संपूर्ण देशभरातून श्रद्धासाठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अशात आता २०२० मधील श्रद्धा वालकरचं एक पत्र समोर आलं आहे. ज्यानुसार आफताब पूनावाला तिला मारून तिचे तुकडे करू शकतो याची कल्पना तिला आधीच होती असं दिसून येत आहे. हे पत्र समोर वाचल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. श्रद्धाचं पोलिसांना दिलेलं पत्र वाचल्यानंतर कंगनाने लिहिलं, “हे तेच पत्र आहे जे श्रद्धाने २०२०मध्ये पोलिसांकडे मदतीची मागणी करण्यासाठी लिहिलं होतं. तो नेहमीच तिला घाबरवत होता तिचे तुकडे करण्याची धमकी देत होता. तिने या पत्रात म्हटलंय की तो तिला ब्लॅकमेल करत होता. पण माहीत नाही त्याने कशाप्रकारे तिचा ब्रेनवॉश करून तिला दिल्लीला नेलं. त्याने तिला तिच्या जगापासून दूर केलं आणि काल्पनिक जगात घेऊन गेला.”
आणखी वाचा- Shraddha Murder Case: “…तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!
कंगनाने पुढे लिहिलं, “आपल्या सर्वांनाच माहीत आहे की तिला लग्नाचं वचन देऊन तिच्याबरोबर विश्वासघात करण्यात आला आहे. ती एक मुलगी होती. तिचा जन्म या जगात जगण्यासाठी झाला होता. पण दुर्दैवाने तिच्यात एक स्त्रीचं हृदयही होतं. जिचा नैसर्गिक स्वभाव हा सुरक्षा करणे आणि घाव भरण्याचा असतो. स्त्रीच्या स्वभातच हे असतं आणि ती कोणातच भेदभाव करत नाही. ती सर्वांना आपलं मानते. मग ती व्यक्ती तिच्या योग्यतेची असू दे किंवा नसू दे. ती सर्वांना तेवढाच जीव लावते.”
आपल्या पोस्टमध्ये कंगनाने आणखी पुढे लिहिलं, “ती परीकथांमध्ये विश्वास ठेवणारी होती. तिला माहीत होतं की जगाला तिचं प्रेम हवं आहे. ती एक देवी होती. जिच्याकडे सर्वांच्या जखमा भरण्याची शक्ती होती. ती कमकुवत नव्हती. ती एक अशी मुलगी होती ज्या परीकथांमध्ये जगतात. जसं या कथांमध्ये परी आपल्या हिरोच्या आत लपलेल्या राक्षसाशी लढण्याचा प्रयत्न करते. आपल्याला माहीत आहे की प्रेमात खूप ताकद असते. श्रद्धा अशाच राक्षसाला मारण्यासाठी खूप पुढे गेली होती पण हिरोला राक्षसालाच जिंकू द्यायचं होतं आणि अखेर तेच झालं”
कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. दरम्यान आफताब श्रद्धाला नेहमी मारहाण करत होता. २०२० मध्ये त्याने श्रद्धाला बेदम मारहाण केली होती. यावेळी तीन दिवस ती रुग्णालयात उपचार घेत होती. त्यादरम्यान २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्यात आफताब विरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आफताब माझी हत्या करून माझ्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून देणार असल्याचे तिने म्हटले होते. दीड वर्षांनी श्रद्धाची ही भीती खरी ठरली. मे २०२२ मध्ये आफताबने दिल्लीमध्ये तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून इतस्तत: फेकले. श्रद्धाने त्यावेळी तक्रार मागे घेतली नसती तर आज कदाचित तिचा जीव वाचला असता.