‘क्वीन’ चित्रपटात एकटीने हनिमूनला जाणाऱ्या बुजऱ्या मुलीचं आयुष्य मांडणारी, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’मध्ये शहरावर अधिराज्य गाजवणाऱ्या गँगस्टरची नायिका, ‘तनू वेड्स मन्नू’मध्ये सरळमार्गी डॉक्टरच्या आयुष्यात आलेली अवखळ मुलगी ते ‘फॅशन’ विश्वात करिअर करायला आलेली आणि नंतर भरकटलेली सुपरमॉडेल- भूमिका वेगवेगळ्या आणि अवघडही, पण कंगनाने प्रत्येक भूमिकेवर आपली छाप उमटवली. विवेकानंदांचं साहित्य वाचणारी आणि त्याचवेळी सातत्याने वादग्रस्त विधानं करुन त्यामध्येच हरवून जाणारी कंगना. भूमिकेसाठी जीवापाड मेहनत घेणारी कंगना खरी की सुरक्षेच्या प्रचंड फौजफाट्यात वावरत मिरवणारी कंगना खरी. स्पिल्ट पर्सनॅलिटी वाटावं इतकी व्यक्तिमत्वाची टोकं कंगनाने वारंवार दाखवून देते. गिरिशिखरांचं राज्य असलेल्या हिमाचलमधून मुंबानगरीत दाखल झालेली कंगना एक केसस्टडीच आहे. पैसा, प्रसिद्धी, संगत काय करु शकते याचं जितंजागतं उदाहरण म्हणजे कंगना. एकीकडे तिचं काम आवडणारे खूप आहेत आणि वक्तव्यांमुळे तिच्यावर टीका करणारेही खूप आहेत. कंगना या दोन्ही विश्वांच्या सांध्यावर कुठेतरी आहे. रीलमधली खरी का रिअलमधली- तीच जाणे…
हिमाचल प्रदेशमध्ये झाला कंगनाचा जन्म
अभिनेत्री कंगना राणौतचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशात मंडी जिल्ह्यातील सूरजपूर नावाच्या गावातील एका राजपूत कुटुंबात झाला. तिची आई आशा रणौत शिक्षिका, तर तिचे वडील अमरदीप राणौत हे व्यावयासिक आहेत. तिला रंगोली व अक्षत नावाची दोन भावंडं आहेत. कंगनाचे आजोबा भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते, तर तिचे पणजोबा सरजू सिंग राणौत हे आमदार होते.
शिक्षण सोडून गाठली दिल्ली
कंगना अभ्यासात खूप हुशार होती. तिचं शिक्षण चंदीगडमधील डीएव्ही शाळेत झालं. तिला डॉक्टर व्हायचं होतं, पण १२ वीमध्ये एका विषयात ती नापास झाली. त्यानंतर ती पुन्हा परीक्षेला बसली नाही. १६ व्या वर्षी तिने शिक्षण आणि हिमाचल प्रदेश दोन्ही सोडलं अन् दिल्ली गाठली. कुटुंबियांविरोधात घर सोडून गेल्याने वडिलांनी तिचा खर्च उचलणार नसल्याचं बजावलं.
दिल्लीत थिएटर करून आली मुंबईत
हिमाचल सोडून दिल्लीत आल्यावर ती काम शोधत होती. अशातच एलिट मॉडेलिंग एजन्सीला तिचा लूक आवडला आणि त्यांनी तिला मॉडेलिंगचा सल्ला दिला. कंगनाने काही मॉडेलिंग असाइनमेंट केल्या, पण तिथं क्रिएटिव्ह काम नव्हतं, म्हणून तिनं अभिनय करायचं ठरवलं. त्यानंतर ती अस्मिता थिएटर ग्रुपमध्ये सहभागी झाली, तिथं अरविंद गौर यांच्या हाताखाली अभिनयाचे धडे गिरवले. मग तिने अनेक नाटकांमध्ये काम केलं आणि चित्रपटात नशीब आजमावण्यासाठी ती दिल्ली सोडून मुंबईला आली.
१७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन
अनुराग बासूच्या चित्रपटातून पदार्पण
मुंबईत कामासाठी आणि दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असताना कंगनाला २००४ मध्ये ‘आय लव्ह यू बॉस’ नावाच्या चित्रपटाची ऑफर आली. याच दरम्यान तिची भेट दिग्दर्शक अनुराग बासूशी झाली. तिने ‘गँगस्टर: अ लव्ह स्टोरी’ सिनेमासाठी ऑडिशन दिली, पण महेश भट्ट यांनी ती लहान असल्याचं कारण देत तिला घेण्यास नकार दिला. तिच्याऐवजी चित्रांगदा सिंहला घेण्यात आलं, पण तिने हा सिनेमा सोडला आणि तो कंगनाला मिळाला. यानंतर तिने ‘आय लव्ह यू बॉस’ मधून काढता पाय घेतला आणि ‘गँगस्टर’मधून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. कंगनाचा पदार्पणाचा चित्रपट हिट झाला आणि तिला खूप लोकप्रियता मिळाली.
कंगनाने मागे वळून पाहिलंच नाही
अवघ्या १९ व्या वर्षी चित्रपटात दमदार पदार्पण करणाऱ्या कंगनाने नंतर मागे वळून पाहिलंच नाही. ‘वो लम्हे’, ‘फॅशन’, ‘राज: द मिस्ट्री कंटिन्यूस’, ‘वादा रहा’, ‘काईट्स’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘डबल धमाल’, ‘तेज’, ‘शूट आऊट अॅट वडाला’, ‘क्रिश ३’ असे अनेक बिग बजेट सुपरहिट सिनेमे तिने मधल्या काळात केले, त्यासाठी तिचे कौतुक झाले आणि पुरस्कारही मिळाले. याशिवाय तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केलं. २०११ मध्ये तिचा ‘तनु वेड्स मनु’ चित्रपट आला होता, अवघ्या १५ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने ५६ कोटींची कमाई केली होती. यानंतर २०१४ मध्ये तिच्या करिअरला कलाटणी देणाला ‘क्वीन’हा चित्रपट आला. हा सिनेमा इतका यशस्वी झाला की, कंगना व या चित्रपटाने त्यावर्षीचे बहुतेक पुरस्कार जिंकले. इतकंच नाही तर या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यानंतर तिचा ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटालाही पहिल्या भागाप्रमाणेच खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
‘धाकड’ कंगना रणौत बॉलीवूडची ‘क्वीन’ झाली, पण…
आपल्या करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या कंगनाने जवळपास एक दशक गाजवलं, पण नंतर मात्र तिच्या सिनेमांना प्रेक्षकांचं फार प्रेम मिळालं नाही. ‘रिव्हॉल्वर रानी’, ‘उंगली’, ‘कट्टी बट्टी’, ‘रंगून’, ‘सिमरन’, ‘मणिकर्णिका: झाँसी की रानी’, ‘जजमेंटल है क्या’, ‘पंगा’, ‘थलायवी’, ‘धाकड’, ‘चंद्रमुखी २’ आणि ‘तेजस’ हे चित्रपट तिने मागच्या नऊ वर्षांत केले, पण यातल्या एकालाही हवं तसं यश मिळालं नाही आणि तिच्या करिअरला उतरती कळा लागली. एकेकाळी ज्या कंगनाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं तिच्या चित्रपटांना आता प्रेक्षकच मिळत नाहीत, अशी अवस्था आहे!
तिच्या विधानांमुळे झाली टीका!
चित्रपट फ्लॉप ठरू लागल्यानंतर कंगनाचा सोशल मीडियावरील वावर वाढला. तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि विधानांमुळे ती चर्चेत राहू लागली. देशाला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य, हे भीक म्हणून मिळालं होतं, मात्र खरं स्वातंत्र्य देशाला २०१४ साली मिळालं,’ असं ती म्हणाली आणि त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली. तसेच तिने स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांना बी- ग्रेड अभिनेत्री म्हटलं होतं, त्या संदर्भातही तिच्यावर प्रचंड टीका झाली. अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्यावर कंगनाने सिनेसृष्टीवर गंभीर आरोप केले. यात गीतकार जावेद अख्तर यांचाही समावेश होता, कंगनाने त्यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी तिच्यावर खटला दाखल केला. याशिवाय तिचा व हृतिक रोशनचा वादही खूप गाजला. संजय राऊत व कंगना यांचा वाद तर सर्वश्रूतच आहे.
पाच वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणारा अभिनेता ठेवतोय रोजे, म्हणाला, “पाणी व कॉफीशिवाय १२-१४ तास…”
ममता बॅनर्जींवर टीकेमुळे ट्विटरने घातली होती बंदी
२०२१ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष विजयी झाला. त्यानंतर भाजपा व त कंगनाने एक ट्वीट केलं होतं. “माझी चूक झाली, ती रावण नाही, कारण तो एक महान राजा होता, त्याने जगातील सर्वात श्रीमंत देश निर्माण केला. पण ही रक्तपिपासू राक्षसीन आहे, ज्या कुणी तिला मतदान केलंय, तुमचे हातही रक्ताने माखले आहेत,” असं तिने लिहिलं होतं.
तिच्या या पोस्टनंतर खूप वाद झाला आणि ट्विटरने तिच्यावर बंदी घातली होती. इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यावर कंगनाची त्या प्लॅटफॉर्मवर वापसी झाली. आताही कंगना तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर आपली मतं मांडत असते आणि सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.