अयोध्येत काल (२२ जानेवारी) राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा रंगली होती. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत जोरदार तयारी करण्यात आली होती. मंदिर परिसरालाही फुलांनी आकर्षित सजावण्यात आले होते. या सोहळ्यात आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराना, रोहित शेट्टी, कंगना रणौत, माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने सहभागी झाले होते. या सोहळ्यादरम्यान कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये कंगना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आनंद साजरा करताना दिसत आहे. कंगना जोरजोरात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देताना दिसत आहे. कंगनाने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘राम आले’ अशी कॅप्शनही दिली आहे. दरम्यान, या सोहळ्यात कंगनाने पारंपरिक लूक परिधान केला होता. पांढऱ्या व केशरी रंगाच्या साडीत कंगना खूप सुंदर दिसत होती. या साडीवर स्वस्तिकची आकर्षक डिझाईन बनवण्यात आले होते.
सोहळ्याच्या एक दिवस अगोदरच कंगना अयोध्येत पोहचली होती. सोहळ्याअगोदर कंगनाने हनुमान मंदिरात होम हवनही केले, तसेच मंदिरात तिने साफ सफाईही केली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच कंगनाने जगदगुरू रामभद्राचार्य व बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांचीही भेट घेतली होती. कंगनाने आपल्या सोशल मीडियावर या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत.