काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचं लोकप्रिय कपूर कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. याचं निमित्त होतं बॉलीवूडचे शोमॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांची १००वी जयंती. यानिमित्ताने कपूर कुटुंबाने शताब्दी कार्यक्रम आयोजित केला होता. याचं आमंत्रण देण्यासाठी कपूर कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी नीतू कपूर, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, आलिया भट्ट, आदर जैन, अनीसा मल्होत्रा होते. या भेटीत कपूर कुटुंबातील सदस्यांनी मोदींशी संवाद साधला. तसंच त्यांना काही प्रश्न विचारले. याच भेटीविषयी अभिनेत्री, खासदार कंगना रणौत यांनी भाष्य केलं आहे.
‘आजतक’च्या ‘अजेंडा में बात’ कार्यक्रमात कंगना रणौत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना विचारलं की, सध्या फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत भेटताना दिसत आहेत. पण, काही दिवसांपूर्वी तुम्ही सांगितलं होतं, तुम्हाला पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी वेळ मिळत नाहीये. तर याबद्दल काय वाटतं?
हेही वाचा – Video: शिवानी सोनार लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नात घालणार पणजीची नथ; म्हणाली, “जुने आणि पारंपरिक दागिने…”
कंगना रणौत म्हणाल्या, “मला वाटतं, आपल्या सिनेसृष्टीला मार्गदर्शनाची खूप गरज आहे. हे सॉफ्ट पॉवर आहे आणि याचा वापर कमी केला जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, आपले इतर नेते असो किंवा माहिती आणि प्रसारण मंत्रालय, मी २० वर्षांपासून या इंडस्ट्रीचा भाग आहे. मला वाटतं, ही इंडस्ट्री पूर्णपणे अनाथ झाली आहे. कारण त्यांच्याकडे मार्गदर्शन नाहीये. मग जिहादी अजेंडा असो किंवा पॅलेस्टिनी अजेंडा, यावर कोणीही वर्चस्व गाजवू शकत नाही. त्यांच्याजवळ कोणतेही मार्गदर्शन नाही, त्यांना कुठे जायचं आहे, हे माहीत नाही.
त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीतील लोक नेहमी असुरक्षित असतात आणि सहज कुठल्याही घटनेत फसतात; ज्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन होते, यावर कंगना यांनी अधिक जोर दिला. त्या म्हणाल्या, “ते पैसे देतात आणि ते कुठेही काहीही करून घेतात. दाऊद त्यांना त्याच्या पार्ट्यांमध्ये घेऊन जातो, त्यामुळे अनेकदा ड्रग्जच्या जाळ्यात अडकतात. हे खूप असुरक्षित आहे. त्यांना जबाबदारी दिली आहे. त्यांना भेटण्याची परवानगी आहे. त्यांनाही वाटतं की, आम्ही पंतप्रधानांना भेटलं पाहिजे. ते आमचं काम बघतात. ते आमच्याबाबतीत विचार करतात. तिथे असं बोललं जात नाही. त्यांना वाटतं की, ते काहीही करू शकतात. मग ते गँगस्टरच्या पार्ट्यांमध्ये जाऊन नाचतात. त्यावेळी त्यांना कोणीही बघत नाही, असं वाटतं.”
हेही वाचा – ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्याची आईच्या उपचारासाठी मदतीची हाक, म्हणाला, “गेले तीन महिने…”
पुढे कंगना रणौत म्हणाल्या की, मला वाटतं, हे खूप चांगलं पाऊल आहे. मेनस्ट्रीमकडे पाहिलं जात आहे. आम्हाला इतर इंडस्ट्री सारखी वागणूक मिळत नाही. आम्ही इतके सारे चित्रपट करतो, त्यातून इतका महसूल गोळा होतो…हां, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी विनंती केली आहे. एकेदिवशी ते मला बोलावतील आणि मी त्यांना भेटेन, अशी आशा आहे.