केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांना मासिक पाळीत पगारी रजा देण्याबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेत आहेत. मासिक पाळी ही शारीरिक व्याधी नाही, त्यामुळे भरपगारी रजा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानाचं काहींनी समर्थन केलं आहे, तर काहींनी विरोध केला आहे. अशातच बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना रणौतने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्मृती इराणींच्या वक्तव्याबद्दल माहिती देणारी एक पोस्ट शेअर करत तिचं मत मांडलं. स्मृती इराणींच्या विधानाचं समर्थन करत कंगनाने लिहिलं, “काम करणारी महिला (वर्किंग वूमन) हे मिथक आहे, कारण आतापर्यंतच्या मानवी इतिहासात एकही काम न करणारी महिला आढळली नाही. शेतात काम करण्यापासून ते घर सांभाळण्यापर्यंत आणि मुलांचे संगोपन करण्यापर्यंत महिला नेहमीच काम करत आल्या आहेत. या काळात कुटुंब, समाज किंवा देशाप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कोणत्याही गोष्टी अडथळा ठरलेल्या नाहीत.”
पुढे कंगना म्हणाली, “जोपर्यंत एखादी विशिष्ट मेडिकल कंडिशन नसेल तोपर्यंत महिलांना मासिक पाळीसाठी पगारी रजेची गरज नसते. कृपया एक गोष्ट समजून घ्या की ही मासिक पाळी आहे, कोणताही आजार किंवा शारीरिक व्याधी नाही.”
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांचं मराठी ऐकलंत का? म्हणाले, “माझं मराठी…”
काय म्हणाल्या होत्या स्मृती इराणी?
राज्यसभेत या मुद्द्यावर बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या होत्या, “मासिक पाळी हा महिलांसाठी अडथळा नसतो. हा त्यांच्या आयुष्यातील प्रवासाचा एक भाग आहे. आता नोकरदार महिलांच्या नावाने मासिक पाळीसाठी पगारी रजा देण्याची चर्चा निरर्थक आहे. स्त्रिया समान हक्कापासून वंचित राहतील, असे मुद्दे आपण उपस्थित करू नयेत. पाळीच्या रजेमुळे महिलांशी भेदभाव होऊ शकतो.”