बाॅलीवूडची क्वीन कंगना रणौत अभिनयासह तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती अनेक विषयांवर तिची मतं मांडत असते. ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. कंगनाला हा चित्रपट आवडला नव्हता; तर दुसरीकडे ‘अ‍ॅनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी कंगनाचं कौतुक केलं आणि तिच्याबरोबर काम करायची इच्छा व्यक्त केली. परंतु, त्यालाही कंगनाने नकार दिला.

अलीकडेच कंगनाने याबद्दलचा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. यात संदीप रेड्डी वांगा म्हणाले होते, “जर मला कंगनासह काम करायची संधी मिळाली आणि जर एखाद्या पात्रासाठी कंगना मला योग्य वाटली तर नक्कीच मी तिला भेटून कथानक सांगेन. तिचा ‘क्वीन’ आणि इतर चित्रपटांमधील अभिनय मला खूप आवडला होता. तिला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट आवडला नसेल तरीही मला त्याचा राग आलेला नाही. कारण मी तिचं काम पाहिल आहे आणि मला तिच्या या वक्तव्याबाबत वाईट नाही वाटलं. मी उपरोधिकपण हे बोलत नसून मला खरंच तिचा अभिनय आवडतो.”

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने उत्तर दिलं. “समीक्षा आणि टीका सारख्या नसतात, प्रत्येक कलाकृतीची समीक्षा आणि चर्चा व्हायला हवी ही एक सामान्य गोष्ट आहे. माझ्या समीक्षेवर हसत हसत संदीपजींनी ज्या प्रकारे माझ्याबद्दल आदर दाखवला, त्यावरून असं म्हणता येईल की ते केवळ ‘मर्दानी’ चित्रपटच बनवत नाहीत, तर त्यांची वृत्तीही ‘मर्दानी’ आहे, धन्यवाद सर. परंतु, कृपया मला कधीही कोणतीही भूमिका देऊ नका नाहीतर तुमचे अल्फा मेल हिरो फेमिनिस्ट होतील आणि मग तुमचेही चित्रपट फ्लाॅप होतील, तुम्ही ब्लॉकबस्टर बनवा, चित्रपटसृष्टीला तुमची गरज आहे,” असं ती म्हणाली.

हेही वाचा… ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांना दिला पूर्णविराम; अभिषेक बच्चनच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोने वेधलं लक्ष

‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाने तिच्या एक्स अकाउंटवर आपली प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली होती, “माझ्या चित्रपटांसाठी जी नकारात्मकता आहे ती खरंच खूप जास्त आहे. मी कठोर परिश्रम करतेय परंतु, प्रेक्षक महिलांवरील अत्याचार -मारहाण दाखवणाऱ्या चित्रपटांना प्रोत्साहन देत आहेत, ज्यामध्ये महिलांना लैंगिक वस्तूंसारखे वागवले जाते आणि बूट चाटण्यास सांगितले जाते. स्त्री सक्षमीकरणाच्या चित्रपटांसाठी ज्याने आपले आयुष्य समर्पित केले आहे, त्या व्यक्तीसाठी हे सर्व दुर्दैवी आहे. येत्या काही वर्षांत कदातिच मी करिअर बदलू शकते, माझं उरलेलं आयुष्य कोणत्यातरी चांगल्या गोष्टीसाठी सार्थकी लावायचं असा माझा विचार आहे.”

दरम्यान, कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिचा आगामी चित्रपट ‘इमर्जेन्सी’ सिनेमा १४ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Story img Loader