अभिनेत्री कंगना रणौत सध्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटाबद्दल आठवण सांगितली आहे. २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘गँगस्टर’ या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
काय म्हणाल्या कंगना रणौत?
पहिल्या चित्रपटाविषयी बोलताना कंगना रणौत म्हणतात, “गँगस्टर चित्रपटाच्या आधी अनुराग बसू यांनी २००४ ला मर्डर हा हिट चित्रपट बनवला होता. त्यानंतर तो त्याच्या नवीन चित्रपटासाठी नवीन अभिनेत्रीचा शोध घेत होता आणि त्यावेळी मी खूप ऑडिशन देत होते. त्यांच्या जुहुमध्ये असणाऱ्या स्टुडिओमध्ये मध्ये मी ऑडिशनसाठी गेले. अनुरागदेखील तिथे होता. त्याने मला सांगितले की, मला तुझे फोटो मिळाले आहेत. त्यानंतर त्याने मला काही गोष्टी करायला सांगितल्या. एक अशी की त्याने दारु प्यायल्याचा सीन करुन दाखवायला सांगितला. त्यानंतर मी कशी रडते हे दाखवायला सांगितले आणि त्यानंतर मला काही डायलॉग म्हणायला लावले. मला जे करायला सांगितलं होतं, ते मी केलं. त्यानंतर मला घरी पाठवण्यात आलं.”
याविषयी पुढे बोलताना त्या म्हणतात, “काही दिवसानंतर मला अनुरागचा फोन आला आणि त्याने मला सांगितले की तुला चित्रपटात घेतले आहे. त्यानंतर काही दिवसांनी मला अनुरागने फोन केला आणि सांगितले की तुला ही भूमिका मिळू शकत नाही. कारण- महेश भट्ट साहेबांना हे वाटते की या भूमिकेसाठी तू खूप तरुण आहेस. अनुरागने मला हेही सांगितले की ही भूमिका चित्रांगदा सिंगला मिळाली आहे. पण त्यानंतर चित्रांगदा फोन उचलत नव्हती त्यामुळे शेवटी ती भूमिका मला मिळाली.” अशा पद्धतीने ‘गँगस्टर’ चित्रपटातील भूमिका मिळाली, अशी आठवण कंगना रणौत यांनी सांगितली.
हेही वाचा: निक्कीमुळे अरबाज पटेलचं ब्रेकअप? गर्लफ्रेंडने नाव घेत केली पोस्ट; म्हणाली, “मला त्याच्याबद्दल…”
‘गँगस्टर’ चित्रपटात कंगना रणौत यांच्याबरोबरच शायनी अहुजा, इमरान हाश्मी हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. महत्वाचे म्हणजे कंगना रणौत यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. अनुराग बसु यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तर महेश भट्ट यांनी निर्मिती केली होती. त्यानंतर त्या २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘वो लम्हें’ आणि २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘लाइफ इन मेट्रो’ या चित्रपटातदेखील दिसल्या. २००८ साली मधु भांडारकर यांच्या ‘फॅशन’ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी कंगना रणौत यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
दरम्यान, कंगना रणौत या लवकरच त्यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमन हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd