बॉलीवूड अभिनेत्री व भाजपाच्या खासदार कंगना रणौत ( Kangana Ranaut ) सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’मुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कंगना यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटानिमित्ताने कंगना रणौत ठिकठिकाणी प्रमोशन करताना दिसत आहेत. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये ‘संजू’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती, याचा किस्सा सांगितला. ‘संजू’ चित्रपटात कंगना यांनी काम करावं, यासाठी रणबीर कपूर त्यांच्या घरी गेला होता. नेमकं काय झालं होतं? वाचा…
बॉलीवूडचा खलनायक म्हणून ओळखला जाणारा संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. तर अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. याच चित्रपटात कंगना रणौत ( Kangana Ranaut ) यांना एका भूमिकेसाठी विचारणा झाली होती. त्या म्हणाल्या, “‘संजू’ चित्रपटात मी करावं, यासाठी स्वतः रणबीर कपूर घरी आला होता. तो म्हणाला, ‘संजू’ चित्रपटात प्लीज काम कर. हा चित्रपट स्वीकार.”
१० ते १५ कोटी रुपयांच्या जाहिरातींना कंगना यांनी नाकारलं
‘सिद्धार्थ कनन’ला मुलाखत देताना कंगना ( Kangana Ranaut ) पुढे म्हणाल्या, “मी अनेक मोठ्या कलाकारांचे चित्रपट नाकारले आहेत. पण यामुळे माझं व्यावसायिक नुकसान झालं नाही.” याआधी कंगना यांनी राज शमानीच्या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, सलमान खान आणि शाहरुख खान यांचे अनेक चित्रपट मी नाकारले होते. कारण मला महिलांच्या दृष्टीकोनातून त्या भूमिका चांगल्या वाटल्या नव्हत्या. तसंच फेअरनेस क्रीम प्रमोट करण्यासाठी १० ते १५ कोटी रुपयांच्या जाहिराती आल्या होत्या, त्या सुद्धा मी नाकारल्या. कारण असं करणं हे वर्णभेदला प्रोत्साहन देण्यासारखं होतं. मी इंडस्ट्रीत यशस्वी होण्याआधीही अशीच दिसत होती.”
हेही वाचा – “रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
दरम्यान, कंगना रणौत ( Kangana Ranaut ) यांचा बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपट १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना रणौत यांच्यासह अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण असे अनेक कलाकार झळकणार आहेत. याआधी कंगना यांचा ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे फ्लॉप ठरला. आता ‘इमर्जन्स’ चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.