भाजपाने कंगना रणौतला हिमाचल प्रदेशातल्या मंडी या ठिकाणाहून लोकसभा निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. कंगना रणौतचं नाव भाजपाच्या पाचव्या यादीत होतं. कंगना तिच्या विविध वक्तव्यांसाठी कायमच ओळखली जाते. अशात कंगनाला तिकिट मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाचा एक अश्लील फोटो पोस्ट केला होता. तो फोटो आणि त्यांची पोस्ट नंतर डिलिट करण्यात आली. पण त्यावरुन बराच वाद रंगला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन दिवसांपूर्वी काय घडलं?

राष्ट्रीय महिला आयोगाने कंगनावर करण्यात आलेल्या पोस्टची दखल घेतली आणि सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाईची मागणी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली. त्यानंतर उर्मिला मातोंडकरला एका मुलाखतीत कंगनाने सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटलं होतं त्याची आठवण कंगनाला नेटकऱ्यांनी करुन दिली. आता कंगनाचं पुन्हा एक वक्तव्य समोर आलं आहे. त्यात तिने सनी लिओनीचं उदाहरण देऊन उर्मिलाबाबतच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

काय म्हणाली कंगना रणौत?

“सॉफ्ट पॉर्नस्टार या शब्दात आक्षेपार्ह काय आहे? यात काहीही आक्षेपार्ह नाही.हा शब्द समाजाने स्वीकारलेला नाही. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या देशात पॉर्नस्टारचा जितका आदर केला जातो तितका कुणाचाच आदर केला जात नाही. सनी लिओनीला जाऊन विचारा.” असं कंगनाने म्हटलं आहे. टाइम्स नाउ समिटला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हे वक्तव्य केलं आहे.

मी प्रश्नाचं उत्तर दिलं, कुणाचा अनादर केला नाही

कंगना पुढे म्हणाली मला विचारलं गेलं की, “उर्मिलाला कुठल्या निकषांवर तिकिट दिलं गेलं? मी त्याचं उत्तर दिलं होतं. लोकांसाठी केलेली जी कला असते त्याचेही काही प्रकार असतात. मी स्वतःला एक बॅलन्स्ड अभिनेत्री मानते. मी आयटम साँग वगैरे कधीही केले नाहीत. पॉर्नस्टारला आपण सहज स्वीकारतो. पण मग शरीरविक्रय करणाऱ्यांना आपण का स्वीकारत नाही?” असाही प्रश्न कंगनाने केला आहे.

हे पण वाचा- Maharashtra News : काँग्रेसने कंगना रणौत यांच्यावर केलेल्या टीकेनंतर नवनीत राणा आक्रमक

तंदुरी मुर्गी, शिला की जवानी असे शब्द ज्या अभिनेत्री सहन करतात त्यांना वेगळं काय म्हणणार? अॅडल्ट कंटेट हा अॅडल्ट कंटेट म्हणून पाहिला पाहिजे. कुठल्याही कलेचा मी आदरच करते आहे. अशाप्रकारे नाचणं, काम करणं ही पण एक कला आहे. मी ते करत नाही, इतकंच माझं म्हणणं आहे असंही कंगनाने म्हटलं आहे.

कंगना उर्मिला मातोंडकरबाबत काय म्हणाली होती?

“उर्मिला मातोंडकर ही सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. ती तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही. ती ओळखली जाते ती फक्त तिच्या सॉफ्ट पॉर्नसाठी तिला तिकिट मिळू शकतं तर मला का नाही? ” असा प्रश्न कंगनाने विचारला होता. तिचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कंगनाने २०२० मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा उल्लेख केला आहे.

नेटकरी काय म्हणाले आहेत?

या सगळ्या प्रकरणानंतर नेटकऱ्यांनी उर्मिला मातोंडकरला कंगना सॉफ्ट पॉर्नस्टार म्हणाली होती त्याची आठवण करुन दिली आहे. कंगनाच्या मुलाखतीचा तो अंश लोक एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत आहेत आणि तू उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होतीस त्याचं काय? असं विचारत आहेत. #उर्मिलामातोंडकर हा हॅशटॅगही नेटकऱ्यांनी ट्रेंड केला आहे. मासूम, भूत, प्यार तुने क्या किया, पिंजर, एक हसीना थी हे चित्रपट उर्मिलाच्या सशक्त अभिनयाचा पुरावा आहेत असं झीनत नावाच्या एका युजरने म्हटलं आहे. कंगना तू उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होतीस विसरलीस का? असाही प्रश्न एका युजरने विचारला आहे. जे आत्ता कंगनाबाबत पोस्ट केली म्हणून गळा काढत आहेत त्यांनी कंगनाचा उर्मिलाबाबतच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही? असा प्रश्न एका युजरने विचारला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut says ask sunny leone how much respect she gets give justification on old statement about urmila scj