बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मीडिया रीपोर्टनुसार अलीकडेच कंगनाने संसदेच्या आवारात तिच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकसभा सचिवालयाकडे परवानगी मागितली आहे. यासंदर्भात कंगनाने पत्रदेखील लिहिलं आहे आणि त्यावर विचार सुरू आहे, परंतु त्यांना परवानगी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे असं स्पष्ट केलं जात आहे.
अभिनेत्रीने लोकसभा सचिवालयाला लिहिलेल्या पत्रात संसदेच्या आवारात आणीबाणीवर आधारित चित्रपटाचे शूटिंग करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. काही मीडिया रीपोर्टनुसार खाजगी संस्थांना संसदेच्या संकुलात शूटिंग किंवा व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी नसते. हे शूटिंग कोणत्या अधिकृत सरकारी कामासाठी केले जात असेल तर ती वेगळी बाब आहे. प्रामुख्याने दूरदर्शन आणि संसद टीव्ही यांनाच संसदेच्या आवारात चित्रीकरणाची करण्याची परवानगी आहे.
आणखी वाचा : “मी पठाण…” हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादची शाहरुखला पाठिंबा देणारी पोस्ट व्हायरल
त्यामुळे कंगनाला या चित्रपटासाठी या परिसरात शूटिंग करायला परवानगी मिळेल की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. कंगना मात्र तिच्या या चित्रपटासाठी जीव ओतून काम करत आहे. शिवाय या परिसरात चित्रीकरणाची तिला परवानगी मिळाली तर याचे राजकीय पडसादसुद्धा उमटू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘इमर्जन्सी’चे शूटिंग या वर्षी जूनमध्ये सुरू झाले होते. कंगनाने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मितीही ती करत आहे. या चित्रपटात ती १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना कंगनाने म्हणाली की, “आणीबाणी हा भारतीय राजकीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता, ज्याने आपला सत्तेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आणि म्हणूनच मी ही कथा सांगण्यास जास्त उत्सुक आहे.” कंगना या चित्रपटानंतर ‘तेजस’मध्येसुद्धा झळकणार आहे.