अभिनेत्री कंगना रणौतने मंगळवारी दिल्लीत विजयादशमीनिमित्त रावण दहन केलं. कंगनाने नवी दिल्लीतील प्रसिद्ध लव कुश रामलीला इथे रावण दहन केले. लाल किल्ल्यावर दरवर्षी आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमाच्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने बाण मारून रावणाचा पुतळा जाळला, असे दिल्लीच्या लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी सांगितले.
कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. “आज मला दिल्लीच्या प्रसिद्ध लवकुश राम लीलामध्ये रावण दहन करण्याचे सौभाग्य मिळाले. ज्याप्रमाणे श्रीरामांनी रावणाशी युद्ध केले, त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सैनिक राक्षसांशी लढतात. जय श्री राम,” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान, कंगनाला रावण दहनासाठी निवडण्याबाबत सिंह पुढे म्हणाले की गेल्या महिन्यात संसदेने मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकालानंतर समितीने कंगना रणौतच्या हस्ते रावण दहन करण्याचा निर्णय घेतला. “फिल्मस्टार असो की राजकारणी, दरवर्षी आमच्या कार्यक्रमात व्हीआयपी पाहुणे असतात. यापूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले आहे. चित्रपट स्टार्सपैकी अजय देवगण आणि जॉन अब्राहम येथे आले आहेत. गेल्या वर्षी प्रभासने रावण दहन केले होते. आमच्या कार्यक्रमाच्या ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिलेने रावण दहन केले,” असं त्यांनी ‘पीटीआय’ला सांगितलं.
वनाधिकाऱ्यांनी ‘बिग बॉस’च्या घरातून स्पर्धकाला केली अटक, ‘ते’ पेंडंट ठरलं कारणीभूत
“लव कुश रामलीला समितीलाही असं वाटतं की महिलांना समान अधिकार असायला हवे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे, पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे. हे विधेयक देश आणि समाजाच्या विकासात मदत करेल. आता एक महिलाही रावण दहन करू शकते. ती वाईट गोष्टींचाही अंत करू शकते. महिलांनाही हा अधिकार दिला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही कंगनाची निवड केली,” असे सिंह म्हणाले.