‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादात अडकला आहे. चित्रपटातील कलाकारांचे लूक्स, व्हीएफएक्स आणि संवाद यामुळे नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. चित्रपटाला समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. चहुबाजूंनी चित्रपटावर टीका होत असतानाच कंगना रणौतच्या इन्स्टाग्राम स्टोरीने लक्ष वेधून घेतलं आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये प्रभू रामाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये राम-सीता आणि हनुमान दाखवण्यात आले आहेत. यासोबतच कंगनाने ‘राम का नाम बदनाम ना करो’ हे गाणेही त्या फोटोंवर लावले आहे. हे गीत १९७१ मध्ये आलेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ याचित्रपटातील आहे. या चित्रपटाची निर्मिती देव आनंद यांनी केली होती आणि त्यात त्यांनी अभिनयही केला होता.
दरम्यान, कंगनाने स्पष्ट उल्लेख केला नसला तरी तिने ‘आदिपुरुष’ चित्रपटावर अप्रत्यक्ष टीका केल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटात प्रभू रामाचे लूक पाहून नेटकरी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत, अशातच कंगनाची ही स्टोरी चर्चेत आहे. कंगनाने ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांना नाव न घेता टोला लगावल्याचं म्हटलं जातंय.