बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगना रणौत यांची आता खासदार पदी वर्णी लागली आहे. खासदार कंगना यांना नव्या पदाचा मानसन्मान मिळण्याआधीच चंदीगढ विमानतळावर एका महिला कॉन्स्टेबलने श्रीमुखात दिल्याने अपमान सहन करावा लागला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे कंगना यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचं नेटकऱ्यांनी मात्र मोठ्या प्रमाणात समर्थन केले आहे. शेतकऱ्यांबाबत कंगना यांनी केलेलं विधान चुकीचंच होतं म्हणत अनेकांनी सीआयएसफच्या अधिकारी कुलविंदर कौर यांची बाजू घेतली आहे. या सगळ्या प्रकरणात कंगनाची बाजू मांडण्यासाठी अनुपम खेर यांनी पुढाकार घेतला आहे. इन्स्टंट बॉलिवूड चॅनेलशी बोलताना अनुपम खेर यांनी कंगनावरील हल्ला हा खासदार म्हणून नाही तर एक महिला म्हणून चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
अनुपम खेर यांनी म्हटले की, “जे घडलं ते फार दुर्दैवी आहे. असं घडायला नको होतं. जे काही तुमचे हेवेदावे किंवा आक्षेप असतील ते बाहेरच्या बाहेर सोडवायला हवेत. ड्युटीवर असल्याचा फायदा घेऊन एका सुरक्षाकर्मीकडून अशा प्रकारची वागणूक निंदनीय आहे. मला असं वाटतं की या देशातील महिलांना याच्याविरुद्ध आवाज उठवायला हवा. कारण कंगना फक्त एक खासदार नाही या देशातील एक महिला आहे.”
दरम्यान, लोकसभा २०२४च्या निवडणुकीत कंगना रणौत यांनी भाजपाच्या तिकीटावर मंडी मतदारसंघातुन उमेदवारी दाखल केली होती. तब्बल ५ लाख १४ हजारांहून अधिक मते प्राप्त करून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा कंगना यांनी पराभव केला आहे. विक्रमादित्य यांना ४ लाख ४२ हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. ७२ हजारांहून अधिक मतांच्या फरकांनी कंगना विजयी झाल्या होत्या.
अनुपम खेर यांनी यापूर्वी सुद्धा कंगना यांच्यासाठी अभिनंदनपर पोस्ट लिहिली होती. “माझी प्रिय कंगना, बहुमताने विजयी झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. तू रॉकस्टार आहेस. तुझा आतापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हिमाचल प्रदेश आणि मंडीमधील लोकांसाठी आणि तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. तू वेळोवेळी सिद्ध केलं आहे की, जर एखाद्याने लक्ष केंद्रीत करून कठोर परिश्रम केले तर काहीही होऊ शकत. जय हो.” असे अनुपम खेर यांनी पोस्टमध्ये लिहिले होते.
दुसरीकडे, कंगना यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप असलेल्या कुलविंदर कौर यांना नोकरीवरून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना या प्रकरणानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी सध्या तपास चालू आहे.