गेल्यावर्षीप्रमाणेच हे वर्षंदेखील अक्षय कुमारसाठी तितकं लाभदायक ठरणार नसल्याचं सध्या म्हंटलं जात आहे. नुकताच अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा बहुचरचर्चित ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर त्याला अतिशय थंड प्रतिसाद मिळाला आहे. एवढे मोठे सुपरस्टार चित्रपटात असूनसुद्धा पहिल्याच दिवशी कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने पूर्णपणे अपयशी ठरला आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेसुद्धा या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून कंगनाने हा चित्रपट सपशेल आपटल्याचं जाहीर केलं आहे. याबरोबरच या पोस्टमध्ये तिने थेट या चित्रपटाचा निर्माता करण जोहर याच्यावर निशाणा साधला आहे. मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जेमतेम ३ कोटींच्या आसपास कमाई केली आहे, तर कंगनाने तिच्या पोस्टमध्ये या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १० लाखांचा गल्ला जमवला असल्याचा दावा केला आहे.
आणखी वाचा : “…तर बॉलिवूड तुमचं स्वागत करतं” नेपोटीजमविषयी आयुष्मान खुरानाचं मोठं वक्तव्य
या पोस्टमध्ये कंगना लिहिते, “करण जोहरचा चित्रपट ‘सेल्फी’ने पहिल्या दिवशी केवळ १० लाखांची कमाई केली आहे, आणि हा एक सुपरफ्लॉप चित्रपट ठरला आहे. ज्यापद्धतीने माझ्या चित्रपटांच्या विरोधात बोललं जातं तसं या चित्रपटाच्या अपयशाबद्दल कोणतंही माध्यम किंवा ट्रेड एक्स्पर्ट काहीच भाष्य करत नाहीत.” या पोस्टमधून कंगनाने तिच्यावर टीका करणाऱ्या लोकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
इतकंच नाही तर अक्षय कुमारला पुरुषरूपातील कंगना म्हणत हिणवल्याबद्दलही कंगनाने भाष्य केलं आहे. हा चित्रपट फ्लॉप होण्याचं खापर कंगना आणि अक्षय कुमार या दोघांवर काही लोकांनी फोडल्याने कंगनाने याबद्दलही पोस्ट करत तिचं परखड मत मांडलं आहे. ‘गुड न्यूज’फेम दिग्दर्शक राज मेहता यांनी ‘सेल्फी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यात अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.