Tejas Box office collection Day 4 : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचा बहुचर्चित चित्रपट तेजस २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. ‘तेजस’ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली.
प्रदर्शनाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. हे आकडे पाहता दोन दिवसात या चित्रपटाने केवळ २.५० कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारीसुद्धा या चित्रपटाला ५ कोटींचा आकडाही पार करता आला नाही. यामुळेच बऱ्याच चित्रपटगृहातून कंगनाच्या चित्रपटाचे शोज कमी करण्यात आले.
आणखी वाचा : अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’चा रामायणाशी नेमका संबंध कसा? जाणून घ्या
‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार रविवारी ‘तेजस’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात सरासरी १० ते १२ लोक असल्याचंही स्पष्ट झालं आहे. सोमवारपासूनच या चित्रपटाचे ५०% शोज कमी करण्यात आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या रीपोर्टनुसार ‘तेजस’ने सोमवारी केवळ ५० लाखांच्या आसपासच कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे. बिहारमधील काही चित्रपटगृहात तर याचं एकही तिकीट विकलं गेलं नसल्याचं चित्रपटगृहाच्या मालकांकडून व वितरकांकडून सांगितलं जात आहे.
नुकतीच कंगनाने चित्रपट प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन पाहावा यासाठी एक व्हिडीओ पोस्ट करत विनंती केली होती. त्या व्हिडीओवरुनही कंगनाला चांगलंच ट्रोल केलं गेलं. आधी बॉलिवूडच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कंगनाचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘धाकड’पेक्षा ठीक असला तरी कंगनाच्या ‘तेजस’चं बॉक्स ऑफिसवर टिकून राहणं हे अशक्य वाटत आहे.