Kangana Ranaut Supports : हॉलीवूड अभिनेत्री ब्लेक लाइव्हलीने तिच्या ‘इट ऑल एंड्स विद अस’ सिनेमातील सहकलाकार आणि दिग्दर्शक जस्टिन बाल्डोनी याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आरोपांबद्दल कंगना रणौत यांनी त्यांचे मत मांडले आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या प्रकरणाला ‘चिंताजनक’ आणि ‘लाजिरवाणे’ असे म्हटले आहे. त्यांनी याची तुलना बॉलीवूडशी करताना मल्याळम चित्रपटसृष्टीतील समस्या मांडणाऱ्या ‘हेमा कमिटी’ अहवालाचा संदर्भ दिला. हा अहवाल याच वर्षी प्रकाशित झाला होता. कंगना यांनी असेही म्हटले की मनोरंजन क्षेत्रात महिलांनी तडजोडीस (Compromise)नकार दिल्यास त्यांना बदनाम केले जाते आणि त्याचा त्यांच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होतो.
कंगना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “ज्या महिला तडजोड करायला नकार देतात, त्यांना बदनाम केले जाते आणि त्यांचे करिअर उद्ध्वस्त होते. हे केवळ बॉलीवूडपुरते मर्यादित नाही. अशाच प्रकारचा अहवाल, ‘हेमा कमिटी’, मल्याळम चित्रपटसृष्टीतून समोर आला होता. ही गोष्ट चिंताजनक आणि लाजिरवाणी आहे.”
हेही वाचा…Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
ब्लेक लिव्हलीचे आरोप काय आहेत?
बीबीसी’च्या रिपोर्टनुसार, ब्लेक लाइव्हलीने २१ डिसेंबर २०२४ रोजी जस्टिन बाल्डोनीविरुद्ध खटला दाखल केला आहे. या खटल्यात तिने जस्टिन बाल्डोनीवर लैंगिक छळाचा आणि कामाच्या ठिकाणी गैर व्यवहार करणे असे आरोप केले आहेत. जस्टिन बाल्डोनीने ब्लेक लाइव्हलीच्या वजनावरही भाष्य केले असा त्याच्यावर करण्यात आला आहे.
जस्टिन बाल्डोनीच्या टीमची प्रतिक्रिया
जस्टिन बाल्डोनीच्या टीमने ब्लेक लाइव्हलीच्या आरोपांना फेटाळले आहे. ‘व्हरायटी’ला दिलेल्या निवेदनात जस्टिन बाल्डोनीच्या टीमने म्हटले, “लाइव्हली आणि तिच्या प्रतिनिधींनी जस्टिन बाल्डोनी, वेफेरर स्टुडिओ आणि त्यांच्या प्रतिनिधींवर अशा प्रकारचे गंभीर आणि खोटे आरोप करणे हे लाजिरवाणे आहे. हा केवळ तिच्या नकारात्मक प्रतिमेला ‘सुधारण्याचा’ आणखी एक हताश प्रयत्न आहे.”