राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना गमवावी लागली आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. अशातच अभिनेत्री कंगना रणौतनेही या निर्णयावर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाने ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे, पण तिने त्यांचा उल्लेख केलेला नाही. यावेळी मुंबईतील तिच्या घरावर कारवाई करण्यात आली होती, त्याचा संदर्भही तिने दिला आहे. त्यामुळे कंगनाने एकूणच उद्धव ठाकरेंना शिवसेना गमवावी लागल्यानंतर प्रतिक्रिया दिल्याचं दिसत आहे.
धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंकडे गेल्यावर आदित्य ठाकरेंनी पोस्ट केलेला ‘तो’ फोटो चर्चेत
“देवतांचा राजा इंद्रसुद्धा दुष्कर्म केल्यावर स्वर्गातून खाली पडतात, मग हा तर फक्त एक नेता आहे, जेव्हा त्याने माझे घर अन्यायाने तोडले होते, तेव्हाच मला समजलं होतं की लवकरच त्याची सत्ता जाईल, देवता चांगल्या कर्मांनी पुन्हा वर जाऊ शकतात, परंतु स्त्रीचा अपमान करणारे लोक कधीच पुन्हा वर उठू शकत नाही, आता परत कधीच तो (उद्धव ठाकरे) या परिस्थितीतून वर येऊ शकणार नाही,” असं ट्वीट कंगना राणौतने केलं आहे. अर्थात आता उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द संपली आहे, असं कंगनाने तिच्या ट्वीटमधून म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने हंगामी आदेशामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षनाव आणि ‘ढाल-तलवार’ या निवडणूक चिन्हाचे वाटप केले होते. मात्र, शुक्रवारी आयोगाने अंतिम निकाल देताना, शिंदे गटाचे हंगामी पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह तातडीने गोठवण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच शिवसेनेच्या २०१८च्या घटनेमध्ये, लोकप्रतिनिधी कायदा व पक्षांतर्गत लोकशाहीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार दुरुस्ती करावी, असाही आदेश आयोगाने दिला आहे.