दिल्लीमध्ये १४ डिसेंबर रोजी (बुधवारी) अॅसिड हल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला. द्वारका परिसरामध्ये एका १७ वर्षीय शाळकरी मुलीवर दिवसाढवळ्या अॅसिड हल्ला करण्यात आला. अॅसिड हल्ल्याचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या प्रकरणाबाबत अभिनेत्री कंगना रणौतने आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच तिने एक धक्कादायक खुलासाही केला आहे.
कंगना इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कंगनाने म्हटलं, “मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी बहीण रंगोली चंदेलवर रस्त्यावरील एका अज्ञात व्यक्तीने अॅसिड हल्ला केला होता. ५२ सर्जरी, मानसिक तसेच शारीरिक त्रासाचा तिला सामना करावा लागला. आमचं कुटुंब उद्धवस्त झालं होतं.”
“या प्रसंगानंतर कोणीही दुचाकी किंवा चालत माझ्या बाजूने जात असेल तर मी माझा चेहरा झाकून घ्यायचे. अज्ञात व्यक्ती माझ्यावर अॅसिड हल्ला करणार असं मला वाटायचं. यामुळे मला स्वतःला एका थेरपीचा आधार घ्यावा लागला.”
आणखी वाचा – Video: दिल्लीत १७ वर्षीय शाळकरी मुलीवर अॅसिड हल्ला; धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद
पुढे कंगना म्हणाली, “अशा गुन्हेगारांना अजूनही थांबवण्यात आलं नाही. सरकारला याविरोधात कठोर पाऊल उचलणं गरजेचं आहे. अॅसिड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे या गौतम गंभीरच्या मताशी मी सहमत आहे.” मुलींवर अॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा द्यावी असं विधान भाजपा खासदार गौतम गंभीरने केलं होतं. आता त्याला कंगनाही पाठिंबा देत आहे.