Tejas Box Office Collection day 1: कंगना रणौतचा ‘तेजस’ चित्रपट अखेर २७ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. कंगना गेले अनेक दिवस या चित्रपटाचं प्रमोशन करत होती. त्यामुळे चित्रपटाची चांगलीच चर्चा होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता त्याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. आकडेवारी पाहता ‘तेजस’ने फारच निराशाजनक कामगिरी केली आहे.
‘सॅल्कनिक’ने दिलेल्या माहितीनुसार, कंगना रणौतच्या ‘तेजस’ने पहिल्या दिवशी फक्त १.२५ कोटी रुपयांची कमाई केली. ही संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. चित्रपटाचा विषय पाहता तो यापेक्षा जास्त व चांगली ओपनिंग करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. हा चित्रपट भारतात १३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. खरं तर चित्रपटाचे आगाऊ बुकिंग खूप कमी झाले होते, त्यामुळेही चित्रपटाची कमाई कमी झाली.
‘तेजस’ रिलीजच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला आहे. पण शनिवार व रविवारी वीकेंडला कमाईत वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. ‘तेजस’ हा चित्रपट लढाऊ विमानांवर आधारित असून कंगनाने त्यात हवाईदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तिच्याशिवाय सिनेमात अंशुल चौहान, वरुण मित्र, आशिष विदयार्थी आणि विशाख नायर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
दरम्यान, ‘तेजस’चे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन फारसे चांगले नाही. या सिनेमाचं बजेट ४५ कोटींच्या जवळपास असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे वीकेंडला चित्रपटाने चांगली कामगिरी न केल्यास कंगनासाठी हा धक्का ठरू शकतो. कारण यापूर्वी आलेले तिचे ‘धाकड’ व ‘चंद्रमुखी २’ हे दोन्ही सिनेमे फ्लॉप ठरले आहेत. ‘तेजस’च्या कमाईत वाढ न झाल्यास कंगनाच्या फ्लॉप सिनेमांची हॅट्रिक होईल.