बॉलीवूडची क्वीन कंगना रणौतचा बहुचर्चित चित्रपट तेजस २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
हेही वाचा- “मिर्जापुर ही अत्यंत टुकार सीरिज…” विधू विनोद चोप्रा यांनी अभिनेता विक्रांत मस्सेसमोर मांडले मत
‘तेजस’ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने १.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. ‘सॅल्कनिक’ने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केवळ १.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन २.५० कोटी रुपये झाले आहे.
गेल्या पाच वर्षात कंगनाचे सगळेच चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. ‘चंद्रमुखी २’, धाकड (२०२२), थलाईवी (२०२१), पंगा (२०२०) जजमेंटल है क्या (२०१९) मणिकर्णिका (२०१९) कंगनाचे हे पाचही चित्रपट एकापाठोपाठ बॉक्स ऑफिसवर आपटले होते. त्यामुळे फ्लॉप होत चाललेल्या करिअरला वाचवण्यासाठी कंगनाला एका हिट चित्रपटाची गरज आहे. तेजस चित्रपट कंगनाच्या करिअरला नवी उभारी देईल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, चित्रपटाची कमाई पाहता ही आशा आता धुसर होताना दिसत आहे.
‘तेजस’ चित्रपटाचं दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केलं आहे. हा चित्रपट एयर फोर्स पायलट तेजस गिलच्या यांच्या जीवनावर आधारीत आहे या चित्रपटात कंगनाने फायटर पायलटची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा एका भारतीय गुप्तहेराला दहशतवादींच्या तावडीतून सोडवण्याच्या एका मिशनवर आधारीत आहे.