अभिनेत्री कंगना रणौत यांचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा नवा ट्रेलर सोमवारी (६ जानेवारी २०२४ ला) प्रदर्शित करण्यात आला. काल (५ जानेवारी २०२४ ला) ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी या चित्रपटाशी संबंधित एक खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कंगना रणौत कशा प्रकारे प्रोस्थेटिक मेकअपच्या साहाय्याने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसू लागतात, हे दाखवले आहे.
अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कंगना रणौत मेकअप करताना दिसत आहेत. या चित्रपटात देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेसाठी त्यांचा लूक प्रोस्थेटिक मेकअपच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. कंगना रणौत या व्हिडीओमध्ये प्रोस्थेटिक मेकअप करणाऱ्या व्यक्तींशी दोन तीन मेकअपच्या सेटमधून कोणता प्रोस्थेटिक मेकअप चांगला दिसेल यावर चर्चा करताना दिसतात. यानंतर कंगना रणौत यांच्या चेहऱ्यावर मेकअप केला जातो. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखे दिसण्यासाठी कंगना यांना डोक्यावर विग घालताना दाखवले आहे. मेकअप प्रक्रियेदरम्यान, त्या काही वेळातच इंदिरा गांधींसारख्या दिसू लागतात.
कंगना रणौत यांचा व्हिडीओ व्हायरल
अनुपम खेर यांनी कंगना रणौत यांचा हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, “शानदार! कंगना रणौत बनल्या भारताच्या सर्वात ताकदवान महिला – इंदिरा गांधी! ऑस्कर विजेते प्रोस्थेटिक आणि मेकअप आर्टिस्ट डीजे मालिनोव्स्की यांच्या कलेमुळे झालेला हा अद्भुत बदल नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.” हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
‘इमर्जन्सी’ चित्रपटाची रिलीज तारीख
अनुपम खेर पुढे लिहितात, “कंगना रणौत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वांत काळ्या पर्वात घेऊन जातो.” कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिक यांसारखे कलाकार देखील झळकणार आहेत.
‘इमर्जन्सी’ चित्रपटाची तारीख जाहीर झाल्यानंतरही हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता. त्यामुळे, चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, होणार की नाही याची चर्चा बॉलीवूडसह राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.