कंगना रणौतच्या चित्रपटांसाठी यंदाचं वर्ष खास राहिलं नाही. तिचे ‘तेजस’ व ‘चंद्रमुखी २’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते, पण ते दोन्ही फ्लॉप ठरले. अशातच अभिनेत्री राजकारणात येण्याच्या चर्चाही बऱ्याच दिवसांपासून आहेत. कंगनाचं राजकारणाबद्दलचं प्रेम सर्वश्रूत आहे, पण ती निवडणूक लढवणार की नाही याबाबत तिने स्पष्ट उत्तर दिलं नव्हतं. आता तिच्या वडिलांनीच याबाबत खुलासा केला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कंगना रणौत २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. आता तिच्या वडिलांनी याबद्दल एक मोठी अपडेट शेअर केली आहे. ‘न्यूज १८’ च्या वृत्तानुसार कंगना भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर पुढील वर्षी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, यावर कंगनाचे वडील अमरदीप रणौत यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
अमरदीप रणौत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना फक्त भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे, परंतु ती कोणत्या जागेवरून निवडणूक लढवेल, हे पक्ष ठरवेल. रविवारी कंगनाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची कुल्लूमधील शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हापासून कंगना भाजपाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता ती पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं आहे.
कंगना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना दिसते. बऱ्याचदा ती राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत असते. पण निवडणूक लढवण्याबद्दल आजपर्यंत स्पष्ट उत्तर देणं टाळायची. आता मात्र तिच्या वडिलांनीच ती राजकारणात येणार असल्याचं सांगितलं आहे. कंगनाने याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान ती कोणत्या जागेवरून खासदारकीची निवडणूक लढवेल, हे येत्या काळातच कळेल.