Kapil Sharma Diet Plan : आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा चित्रपटही करतोय. कपिलने त्यासाठी स्वतःत बरेच बदल केले आहेत. कपिल शर्माचा ‘फॅट टू फिट’ प्रवास सर्वांनी पाहिला आहे. तो आता पूर्वीपेक्षा खूपच तंदुरुस्त झाला आहे. २०१४ मध्ये कपिल शर्मा फिटनेस ट्रेनर योगेश भतेजाला भेटला होता. त्यानेच कपिलला वजन कमी करण्यास मदत केली. सुरुवातीला कपिलसाठी हा प्रवास खूप कठीण होता, पण त्याने फिट व्हायचं ठरवलं होतं, त्यासाठी मेहनत घेतली आणि त्याने त्याचं ध्येय पूर्ण केलं.
कपिल शर्माचा ट्रेनर योगेश भतेजाने स्वतः कपिलच्या प्रवासाबद्दल सांगितलंय. कपिल शर्माचे काम असं आहे की त्याला वेळ मिळत नाही, त्यामुळे त्याचा फिटनेसचा प्रवास आव्हानात्मक होता. कपिल मध्यरात्री वर्कआउट करायचा, असं योगेशने सांगितलं. “कपिल एक क्रिएटिव्ह व्यक्ती आहे, त्यामुळे त्याच्या डोक्यात आगामी भागांबद्दल विचार असायचे, तो त्याचं प्लॅनिंग करत असल्याने खूप व्यग्र राहायचा. त्यामुळे आम्ही मध्यरात्री आणि अगदी पहाटे २ वाजताही त्याला ट्रेनिंग दिले. कामामुळे त्याचा स्लिपींग पॅटर्न बिघडला होती. म्हणून आम्ही बेसिक स्ट्रेचिंग आणि ब्रीदिंग प्रॅक्टिसपासून सुरुवात केली होती,” असं योगेश भतेजा म्हणाला.
दोन तास वर्कआउट करायचा कपिल शर्मा
कपिलच्या ट्रेनरने सांगितलं की तो २ तास वर्कआउट करायचा. त्यापैकी ४० मिनिटं तो कार्डिओ करायचा आणि मग तो वेट ट्रेनिंग आणि अॅक्वा वर्कआउट करायचा. कपिल कधीकधी रात्री १ तास चालायला जायचा, असंही योगेश भतेजा म्हणाला.
कपिलच्या आहाराबद्दल ट्रेनर म्हणाला…
ट्रेनरने कपिल शर्माच्या रुटीनबद्दल सांगितलं. कपिल प्रोटीनचे प्रमाण जास्त असलेला आहार घ्यायचा, तसेच तो पाणीदेखील भरपूर प्रमाणात प्यायचा, यामुळे त्याचे वजन कमी होण्यास मदत झाली, असं भतेजा म्हणाला. कपिलच्या शरीरात कोणते व्हिटॅमिन्स व मिनरल कमी आहेत, ते जाणून घ्यासाठी त्याची रक्ताची चाचणी केली होती, असंही भतेजाने नमूद केलं.
योगेश भतेजा म्हणाला की कपिल पंजाबी आहे, त्यामुळे त्याला खायला खूप आवडतं. पण जेव्हा डाएटची गरज असते तेव्हा तो मर्यादित कॅलरीज असलेलं जेवण खातो. जेव्हा कपिलला एखाद्या प्रोजेक्टसाठी वजन कमी करावं लागतं तेव्हा तो फक्त सूप आणि सलाद खातो आणि काही वेळा इंटरमिटेंट फास्टिंग करतो.