लोकप्रिय पंजाबी गायक आणि गीतकार मिका सिंगने अभिनेता कमाल आर खान म्हणजेच केआरकेबद्दल काही किस्से सांगितले आहेत. केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेक कलाकारांबद्दल वाईट बोलत असतो, ज्यामुळे बऱ्याचदा टीकेचा धनी ठरतो. हा केआरके आपला चांगला मित्र असल्याचं मिका सिंगने सांगितलं. दोघेही दुबईत एकमेकांचे शेजारी आहेत. मिका काही लोकांबरोबर केआरकेला भेटायला गेला, तेव्हाचे प्रसंग त्याने सांगितले आहेत.
द लल्लनटॉपला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मिका सिंगने केआरकेबरोबर त्याचं नातं कसं आहे, याचा खुलासा केला. तसेच इंडस्ट्रीतील काही लोकांबरोबरचे किस्से सांगितले. एकदा मिका हनी सिंग, विवेक ओबेरॉय आणि कपिल शर्मा यांना त्यांचे वाद मिटवण्यासाठी केआरकेच्या घरी घेऊन गेला होता. हे लोक केआरके सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल जे बोलतो, त्यामुळे संतापले होते.
केआरके खूप प्रेमळ आहे – मिका सिंग
मिका सिंग केआरकेबद्दल म्हणाला, “तो माझ्या मुलासारखा आहे. तो खूप प्रेमळ आहे. एकेकाळी तो माझ्या स्टुडिओच्या अगदी जवळ राहत असे. मी अनेकदा त्याला भेटायला जायचो, काही वेळा त्याला न सांगताही मी त्याच्या घरी चहा पिऊन यायचो. मी त्याला ‘भाई’ (भाऊ) म्हणायचो. त्याची माझ्याशी मैत्री झाली. तो सर्व हिरोंबद्दल वाईट बोलायचा; त्यांच्यापैकी काही माझ्याकडे यायचे आणि ‘याला समजाव’ असं मला सांगायचे. त्यामुळे मी मध्यस्थाच्या भूमिकेत असायचो.”
जेव्हा हनी सिंग केआरकेला भेटला
केआरके व हनी सिंगच्या भेटीबद्दल मिकाने सांगितलं. या भेटीत हनीने केआरकेचे केस ओढले होते. मिका म्हणाला, “हनीला हे आता आठवत नसेल पण केआरकेने हनीबद्दल काहीतरी म्हटलं होतं. त्यामुळे हनी खूप नाराज झाला होता. तो मला म्हणाला, ‘यार, हा असं बोलतो माझ्याबद्दल.’ आयुष्मान खुराना, कपिल शर्माही केआरकेवर प्रचंड चिडले होते. एकदा मी हनीला म्हणालो, आपण त्याच्याकडे जाऊ, दुबईत त्याला भेटू आणि बोलू, आपण दोघे नशेत असल्यासारखे वागू. ‘तो आपल्याला शिवीगाळ करेल, पण तुला त्याच्याशी जसं वागायचं तसं वाग.’ आम्ही त्याच्याशी खूप उद्धट वागलो. दुसऱ्या दिवशी केआरके आम्हाला म्हणाला की आम्ही त्याच्याबरोबर खूप वाईट वागलो. आणि मी त्याला सांगितलं की मला काहीही आठवत नाही कारण आम्ही नशेत होतो. पण आम्ही त्याचे केस ओढले होते.”
कपिल शर्माने घातलेला गोंधळ
कपिल शर्मा जेव्हा केआरकेला भेटायला गेला तेव्हा काय घडलं होतं, याचा खुलासा मिकाने केला. “आता कपिल शर्माबद्दल बोलुयात. ही २०१२-२०१३ मधील गोष्ट आहे. तो केआरकेवर खूप नाराज होता. केआरके माझा शेजारी आहे हे कपिलला समजल्यावर त्याला कपिलला त्याला मारायचं होतं. त्या रात्री मी त्याला केआरकेच्या घरी नेऊन मारहाण करावी अशी त्याची इच्छा होती. मी त्याला तसं न करण्याची विनंती केली. पण आम्ही सकाळी ४-५ वाजताच्या सुमारास त्याच्याकडे गेलो, तो घरी नव्हता, त्याचा स्टाफ बाहेर आला. त्यानंतर कपिलने त्याच्या घरातील काच फोडली आणि गोंधळ घातला,” असं मिका सिंगने सांगितलं.