१९९५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘करण अर्जुन’ हा चित्रपट बॉलीवूडचा एक आयकॉनिक चित्रपट ठरला. आता हा चित्रपट ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती राकेश रोशन यांनी केली होती, या सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नोव्हेंबर महिन्यात भारतासह जगभरातील सिनेमागृहांमध्ये पुनःप्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात सलमान खान, शाहरुख खानसह काजोल आणि राखी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आज (१३ नोव्हेंबर २०२४) ला सोशल मीडियावर एक नवा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा…दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”

राकेश रोशन यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशननेदेखील ‘करण अर्जुन’ची संकल्पना कशी उदयास आली याबद्दल खास आठवण सोशल मीडियावर शेअर केली. त्याने X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, “१९९२ मधल्या (माझ्या मते) एका दुपारी आम्ही सगळे पप्पांच्या (राकेश रोशन) लिव्हिंग रूममध्ये ‘करण अर्जुन’च्या पटकथेवर चर्चा करत होतो. त्याच वेळी अचानक दीर्घ शांततेनंतर पप्पांना एक आयडिया सुचली. त्यांनी आम्हाला मध्यंतरातील एक थरारक फाईट सिक्वेन्स कसा असेल याबद्दल सांगायला सुरुवात केली, त्यांचे भाव अधिक तीव्र होत गेले आणि त्या एका क्षणी ते जोरात म्हटले, ‘भाग अर्जुन, भाग अर्जुन!’ हे ऐकून, १७ वर्षांचा असलेल्या माझ्यासाठी तो एक पहिला “सिनेमॅटिक ” अनुभव होता!”

हृतिकने पुढे लिहिले, “पप्पांचा (राकेश रोशन) या सिनेमातील सीन सांगून झाल्यावर माझ्या अंगावर काटा आला, जणू काही आम्ही थिएटरमध्ये बसलो होतो असे मला वाटू लागले. सर्वजण टाळ्या वाजवू लागले. त्याच क्षणी मला कळलं की हा चित्रपट एक जबरदस्त ब्लॉकबस्टर ठरणार आहे! ३० वर्षांनंतर, ‘करण अर्जुन’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. २२ नोव्हेंबर, २०२४ पासून हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये येणार आहे!”

हेही वाचा…‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर

शाहरुख खानने देखील आपल्या इन्स्टाग्रामवरून या सिनेमाच्या पुनःप्रदर्शनाची घोषणा करत लिहिले, “काही बंध इतके गहिरे असतात, ज्यांच्यासाठी एक जन्म अपुरा ठरतो! २२ नोव्हेंबरपासून ‘करण अर्जुन’ पुन्हा एकदा जागतिक स्तरावर प्रदर्शित होत आहे!” काजोलनेही लिहिले, “हे तर फक्त ट्रेलर आहे, २२ नोव्हेंबरपासून ‘करण अर्जुन’च्या प्रेमाचा बंधन पुन्हा एकदा जगभरातील सिनेमागृहांमध्ये पाहायला मिळणार आहे!”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan arjun re release hrithik roshan share memories of movie making shah rukh and salman khan iconic 1995 film psg