‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाच्या यशानंतर बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एकेकाळी एकमेकांचे शत्रू असलेले हे दोघे आता त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ‘दोस्ताना २’मुळे करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे दोघे बोलतही नव्हते. मात्र, आता हे दोघेही बऱ्याच काळाने एकत्र आले आहेत.
राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या ‘आयफा २०२५ पुरस्कार’ सोहळ्यादरम्यान करण व कार्तिकने मिळून एक रॅप गाणे गायले, ज्यामध्ये करणने कार्तिकवर चित्रपटाची फ्रँचायजी चोरल्याचा आरोप केला. तर, कार्तिकनेही करणच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल वक्तव्य केले. कार्तिकने त्याच्या सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघे रॅप गाणे गात असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘K vs K Rap War’ अशी कॅप्शन लिहीत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत रॅप गाणे गाताना करण असे म्हणतो, “तू नवीन विद्यार्थी आहेस आणि मी या क्षेत्रात चिरतरुण आहे. मी तुला खऱ्या रॉयल्टीची ओळख करून देतो. खान आणि कपूर हे OG आहेत. आजचे हीरो त्यांच्या फ्रँचायजी चोरतात”. कार्तिक आर्यननेही यावर प्रतिक्रिया देत म्हटले, “फ्रँचायझी चोरणे हेदेखील मुलांचे खेळ नाहीत. मी कठोर परिश्रम करतो. म्हणूनच मी अपयशी होत नाही. तुझा ‘स्टुडंट ऑफ द इयर २’सुद्धा चालला नाही; पण मी माझ्या मेहनतीनं ‘भूल भुलैया ३’ यशस्वी केला.”
यापुढे करण त्याला रॅपद्वारे मी ‘किंगमेकर’ असल्याचे म्हणतो; तर कार्तिकही त्याला मी घराणेशाहीतील नसलो तरी ‘हिट’ असल्याचे म्हणतो. दोघांमधील हे रॅप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उपस्थितांनीही दोघांच्या रॅपचा आनंद लुटला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दोघांचीही चाहते मंडळी या रॅपवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षात कार्तिकचे ‘चंदू चॅम्पियन’ व ‘भूल भुलैया ३’ असे दोन चित्रपट आले. हे दोन्ही चित्रपट यशस्वी झाले. त्यानंतर लवकरच तो ‘आशिकी ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कार्तिकचे अनेक चाहते या चित्रपटाची वाट बघत आहेत.