संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपट सुपरहिट ठरला. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर अभिनीत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटातील संवाद, गाणी हिट ठरली. मात्र या चित्रपटात लक्षवेधी ठरली ती भाभी २ म्हणजे अभिनेत्री तृप्ती डिमरी. तृप्तीने या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘अॅनिमल’नंतर आता तृप्ती प्रेक्षकांना ‘बॅड न्यूज’ द्यायला देत आहे.
प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने नुकतीच नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘बॅड न्यूज’ असं आहे. याच चित्रपटात तृप्ती डिमरीसह विकी कौशल आणि एमी विर्क झळकणार आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक करणने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
२०१९मध्ये अक्षय कुमार, करीना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गुड न्यूज’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता त्यानंतर ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. करण जोहरने चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे, “एंटरटेनिंग हंगामासाठी तयार राहा. एक कॉमेडी चित्रपट येत आहे, जो सत्य घटनेवर आधारित आहे. ‘बॅड न्यूज’ १९ जुलै २०२४ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.”
दरम्यान, ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाच्या पहिल्या लूकवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तृप्ती, विक्की, एमीच्या या नव्या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं नेटकऱ्यांनी करण जोहरच्या पोस्टवर लिहिलं आहे.