‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा करण जोहर दिग्दर्शित चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘रॉकी और रानी’मधील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची सध्या विशेष चर्चा होत आहे. दिग्दर्शक करण जोहरने याबाबत नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा : “हिरो आणि हिरोईनला वेगवेगळे मानधन…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “हा भेदभाव…”
करण जोहर ‘फिल्म कम्पेनियन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “शबाना आझमी आणि धर्मेंद्रजी हे दोघेही खूप मोठे कलाकार आहेत. त्यामुळे या लिपलॉक सीनवरून मतभेद होण्याचा प्रश्नच नाहीये. जेव्हा धरमजींना याची कल्पना दिली तेव्हा ते म्हणाले, ‘ठिक आहे करूया…’ दोन महान आणि ज्येष्ठ कलाकारांनी संपूर्ण चित्रपटात अतिशय उत्तम काम केले आहे. दोघांनीही मला कधीच कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. त्यांनी मला त्या सीनसाठी होकार कळवला होता.”
करण जोहर पुढे म्हणाला, “मला खात्री होती की, ‘अभी ना जाओ छोड कर’ हे गाणं शबाना आणि धर्मेंद्र यांच्या पात्रांचे वर्णन करणारे उत्तम गाणे आहे. दोघेही जुना काळ आठवत असताना ते गाणे सुरु होते असा स्क्रिप्टचा भाग होता आणि एकंदर तो सीन मला स्वत:लाही खूप आवडला आहे.” याविषयी शबाना आझमी म्हणाल्या, “मला माहिती नाही प्रेक्षक एका लहानशा सीनवरून एवढा विषय का वाढवत आहेत. तो स्क्रिप्टचा एक भाग होता आणि माझे पती जावेद अख्तर यांना कोणतीही अडचण नव्हती.”
हेही वाचा : “स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचं यश…” सई ताम्हणकरचा सिनेसृष्टीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली “समान वेतन लांब…”
दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत ५३ कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह, शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल असा अंदाज काही चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे.