कोल्ड प्ले हा जगभरात नावाजला गेलेला बँड आता मुंबईमध्ये आपला कार्यक्रम सादर करणार आहे. “म्युझिक ऑफ दी स्फीअर्स वर्ल्ड टूर २०२५” असं भारदस्त नाव असलेला हा कार्यक्रम जानेवारीत मुंबईत होणार आहे. मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादामुळे कोल्ड प्लेने तिसरा शो करायचे ठरवले आहे. आधी जाहीर केलेल्या शोचे बुकिंग ऑनलाइन माध्यमातून तात्काळ संपूर्ण विकले गेल्याने चाहते नाराज झाले होते, त्यामुळे शो वाढवण्याचा निर्णय कोल्ड प्लेने घेतला. हा शो बघायची इच्छा प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक करण जोहरलाही होती, परंतु त्याच्या इच्छेवर पाणी पडलं आहे. रविवारी रात्री इन्स्टाग्रामच्या माध्यमातून करणने या रॉक बँडच्या शोचं तिकीट आपल्यालादेखील मिळाले नसल्याचे सांगितले, त्यामुळे सर्वसामान्य रसिकच नाही तर खुद्द करण जोहरलाही या शोपासून वंचित रहावे लागणार आहे.
चाहत्यांना आपली झालेली निराशा सांगताना करणनं म्हटलंय, “कोल्ड प्ले व मिनी केली नेहमीच तुमचे पाय जमिनीवर ठेवण्यात मदत करतात. तुम्हाला जे हवंहवंसं वाटतं ते नेहमीच मिळतं असं नाही.” २१ जानेवारी रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. बुक माय शोवर तिकिटांची विक्री काल रविवारी दुपारी २ वाजता सुरू झाली आणि अवघ्या तासाभरातच करणनं आपल्या पदरी पडलेली निराशा इन्स्टावर व्यक्त केली.
बुकिंग सुरू झाल्यावर नक्की काय घडलं?
आधीच्या शोंना मिळालेल्या प्रचंड मागणीमुळे डी. वाय. पाटील ग्राउंडवर २१ जानेवारी रोजी तिसरा शो करण्याचे नंतर ठरवण्यात आले. कोल्ड प्लेनं रविवारी, एक्सच्या माध्यमातून तशी कल्पना देत दुपारी २ वाजता तिकीट विक्री सुरू होईल असे सांगत बुकिंगची लिंकही सोबत दिली.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर प्रचंड प्रतिसादामुळे बुक माय शोची वेबसाइट व ॲप दोन्हीही बुकिंग ओपन होताच क्रॅश झाले. काही वेळातच कोल्ड प्ले, बुक माय शो व क्रॅश्ड असे हॅशटॅग्ज एक्सवर ट्रेंड व्हायला लागले.
आधीचे शो कधी आहेत
यापूर्वी कोल्ड प्लेने दोन शो जाहीर केले होते. जानेवारी १८ व १९, २०२५ अशा दोन दिवशी डी. वाय. पाटील स्टेडियममध्येच हे शो होणार आहेत. अनेक चाहत्यांनी बुकिंग करताना त्यांना आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये फ्रीझ झालेल्या स्क्रीन्स शॉट्सचा समावेश आहे. प्रचंड मागणीमुळे अनेकांना तिकीट बुक करताना आलेल्या अडचणींचा पाढाच या स्क्रीन शॉट्समध्ये मांडला होता.
‘बुक माय शो’च्या सांगण्यानुसार पहिल्या दोन शोंचे बुकिंग १२ वाजता सुरू होणार होते, परंतु अवघ्या १५ मिनिटांमध्ये तिकिटे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. थोडक्यात म्हणजे दोन्ही शो अवघ्या १५ मिनिटांमध्ये फुल झाले. ‘बुक माय शो’च्या प्रवक्त्याने भारतातील लाइव्ह एंटरटेनमेंटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याची प्रतिक्रिया दिली. कोल्ड प्लेचे भारतात किती मोठ्या संख्येने चाहते आहेत, हेच यातून दिसून आले आहे.
हेही वाचा…अभिनेता परवीन डबास अपघात : पत्नी प्रीती झांगियानीने दिली प्रकृतीची माहिती
बेकायदा तिकिटे विकणाऱ्यांपासून सावध राहा
या प्रवक्त्याच्या सांगण्यानुसार, रविवारी तब्बल १.३ कोटी चाहत्यांनी ऑनलाइन तिकिटे खरेदी करण्यासाठी लॉगइन केले. कोल्ड प्लेच्या भारतातील दौऱ्यातील कार्यक्रमांची तिकिटे अनधिकृत संकेतस्थळावरून खरेदी करू नका, असेही ‘बुक माय शो’ने सांगितले आहे. काही अनधिकृत प्लॅटफॉर्म्स अधिकृत सेलच्या आधी व नंतर अशी तिकिटे विकण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्या लक्षात आल्याचे ‘बुक माय शो’ने म्हटले आहे.
हेही वाचा…रणबीर कपूर लेक राहासाठी गातो चक्क मल्याळम अंगाई, तर आजी सोनी राजदान गातात ‘हे’ गाणं
ही तिकिटे अवैध असून त्यामुळे पैसेही जातील व शोही बघता येणार नाही. भारतामध्ये अशा प्रकारे तिकिटे विकणे बेकायदा असल्याचेही त्यांनी सांगितले असून या घोटाळ्यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘बुक माय शो’ने अवैध तिकिटांसंदर्भातला इशाराच एक्सच्या माध्यमातून कोल्ड प्लेच्या सर्व चाहत्यांना दिला आहे.