बहुप्रतिक्षीत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा बॉलीवूड चित्रपट शुक्रवारी (२८ जुलै) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक करण जोहरचा कमबॅक चित्रपट असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकार आहेत.
मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ११.५० कोटींची कमाई केली. ‘सॅकनिल्क’च्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ने दुसऱ्या दिवशी जवळपास १६ कोटींची कमाई केली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने दोन दिवसांत २५ कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांबरोबरच मराठमोळ्या क्षिति जोगने चित्रपटात रणवीरच्या आईची भूमिका निभावली आहे.
आणखी वाचा : “लॉजिक नहीं मॅजिक का खेल…” अभिषेक बच्चन व सैयामी खेरच्या आगामी ‘घुमर’चा फर्स्ट लूक आला समोर
क्षितिचं प्रेक्षकांकडून तर कौतुक होतच आहे, पण खुद्द करण जोहरनेही क्षितिचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार करण जोहर म्हणाला, “मी क्षितिचा अभिनय पाहिला आहे, ती एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे या भूमिकेला ती योग्य न्याय देईल अशी माझी खात्री होती. क्षिति स्वतःला अगदी झोकून देऊन काम करते. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आज लोक तिचं कौतुक करत आहेत, पण तिने घेतलेली मेहनत मी सेटवर प्रत्यक्ष पाहिली आहे, म्हणूनच ती कोणतीही भूमिका अगदी लीलया पेलू शकते.”
चित्रपटात क्षिति जोगने रणवीर सिंगच्या आईची भूमिका केली आहे जीला गायिका बनायचं असतं, पण लग्नानंतर आलेल्या घरगुती जवाबदाऱ्या आणि इतर काही कारणांमुळे तिचं हे स्वप्न मारलं जातं. क्षितिच्या अभिनयाची खूप प्रशंसा होत आहे. क्षिति मध्यंतरी तिचा पती हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेल्या ‘झिम्मा’मध्ये झळकली होती. या मराठी चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती.